Uday Samant 
रत्नागिरी

Uday Samant : विरोधकांच्या अफवांना बळी पडू नका

पालकमंत्री ना. उदय सामंत ः विकासासाठी महायुतीलाच विजयी करण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुतीचाच दणदणीत विजय होईल आणि जिल्हा परिषदेवर भगवा फडकेल, असा ठाम विश्वास राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी व्यक्त केला. वाटद जिल्हा परिषद गटातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत 32 पैकी 29 जागा जिंकून महायुतीने विरोधकांना स्पष्ट पराभव दिला होता. हाच कौल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही दिसून येईल. जिल्हा परिषदेवर महायुतीचाच अध्यक्ष बसेल आणि विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल, असे सामंत यांनी ठामपणे सांगितले.

महिलांच्या मोठ्या उपस्थितीने भारावून गेलेल्या सामंत यांनी विरोधकांकडून पसरवण्यात येणाऱ्या अफवांचा तीव्र शब्दांत समाचार घेतला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नसून, जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत ही योजना सुरूच राहील, असे त्यांनी ठणकावून सांगितले. महिलांना केवळ 1500 रुपये देऊन थांबणार नाही, तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून 35 टक्के अनुदानावर अर्थसाहाय्य देऊन त्यांना लखपती बनवण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींची फी माफ करण्याचा निर्णय केवळ महायुती सरकारनेच घेतल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. एमआयडीसीच्या मुद्द्यावर बोलताना ना. सामंत म्हणाले की, शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय आणि विश्वासात न घेता कोणताही प्रकल्प लादला जाणार नाही. स्थानिक शेतकऱ्यांच्या शंका दूर करून, त्यांना योग्य मोबदला मिळाल्याशिवाय येथे एमआयडीसी होणार नाही. विरोधक केवळ संभ्रम निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आपण 2004 पासून केलेल्या विकासकामांचा उल्लेख करताना ना. सामंत यांनी जयगड परिसरातील रस्त्यांची उदाहरणे दिली. पूर्वी जिथे रस्तेच नव्हते, तिथे आज हायवेसारखे रस्ते उभे राहिले आहेत. जातीपातीचे राजकारण न करता सर्वांना सोबत घेऊन विकास साधण्याचे काम महायुतीने केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे विकासाच्या जोरावरच मते मागत असून, धनुष्यबाण आणि कमळ चिन्हासमोरील बटण दाबून महायुतीला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. सभेत भाजप नेते विवेक सुर्वे आणि शिवसेनेचे नेते बाबू पाटील यांच्या एकत्रित उपस्थितीचा उल्लेख करत, या मनोमिलनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवे बळ निर्माण होईल, असे सामंत यांनी सांगितले. या सभेला सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, प्रकाश साळवी, राजेश मोरे, जिल्हा परिषद उमेदवार अनुष्का खेडेकर, हर्षदा गावडे, संजय दत्त माने यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT