Uday Samant Pudhari
रत्नागिरी

Uday Samant : बंडखोरांचा पराभव करणाऱ्या शिलेदारांना बक्षीस

मंत्री उदय सामंत यांनी वापरले जिल्हा परिषद सभापती निवडीत धक्कातंत्र

पुढारी वृत्तसेवा

जान्हवी पाटील

रत्नागिरी : जिल्हा परिषद सभापती निवडीत शिवसेना नेते मंत्री उदय सामंत यांनी मोठे धक्कातंत्र वापरले, जुन्या अनुभवी चेहऱ्यांना बाजूला सारून पूर्णपणे नवीन फळीला संधी दिली आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद निवडणुकीत बंडखोरांचा पराभव करणाऱ्या शिलेदारांना या निवडीत मोठे बक्षीस मिळाले आहे. या निवडीतून मंत्री सामंत यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, जे पक्षाशी एकनिष्ठ राहतील, त्यांना सत्तेत मानाचे स्थान दिले जाईल.

या नव्या निवडींमध्ये सर्वात मोठी चर्चा ही अर्थ व शिक्षण सभापती पदाची आहे. जिल्हा परिषदेचे अत्यंत अभ्यासू , ज्येष्ठ सदस्य म्हणून ओळखले जाणारे उदय बने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती. त्यांच्यासारख्या मातब्बर नेत्याविरुद्ध निवडणूक लढवणे कठीण असल्याचे सांगितले जात होते; मात्र शिवसेना नेते उदय सामंत यांनी याठिकाणी नंदकुमार मुरकर या नवीन चेहऱ्याला पूर्ण विश्वासाने ताकद देत पाठबळ दिले. जिल्हा परिषदेला नवीन असलेल्या नंदकुमार मुरकर यांनी उदय बने यांचा पराभव केला. या विजयाची दखल घेत उदय सामंत यांनी मुरकर यांना अर्थ व शिक्षण समिती सभापती पदाची महत्त्वाची जबाबदारी देत त्यांच्या निष्ठेचे चीज केले आहे.

माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांनी हातखंबा गटातून बंडखोरी केल्यामुळे तेथील लढत अत्यंत चुरशीची झाली होती. या बंडखोरीला न जुमानता ॲड. सुयोग नंदकुमार कांबळे यांनी परशुराम कदम यांचा पराभव केला आणि पक्षाची जागा राखली. त्यांच्या या कामगिरीचे बक्षीस म्हणून कांबळे यांची आता समाजकल्याण सभापतीपदी वर्णी लागली आहे.

एकेकाळी ठाकरेसेनेचे नेते भास्कर जाधव यांची निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे महेश नाटेकर यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्ष बळकटीसाठी गुहाहारमधून चांगले काम केले. शेकडो कार्यकर्त्यांना शिंदेसेनेत आणले. त्यांची पक्षाशी असलेली एकनिष्ठता पाहून त्यांना कृषी व पशुसंवर्धन सभापती देण्यात आले. शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री, शिवसेना उपनेते उदय सामंत यांनी राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, माजी आमदार सदानंद चव्हाण व अन्य महत्वपूर्ण पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून जि.प. सभापती निवड जाहीर केले.

....म्हणूनच मंडणगडला अध्यक्षपद मिळाले

मंडणगडच्या इतिहासात पहिल्यांदाच अस्मिता केंद्रे यांच्या रूपाने जि.प. अध्यक्षपद मिळाले आहे. जि.प. निवडणुकीत दापोली, मंडणगड, खेड या तालुक्यात यश खेचून आणण्यात राज्यमंत्री योगेश कदम यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मंत्री उदय सामंत यांच्यासोबत पार पाडली होती. त्यामुळे सामंत यांनी मंडणगडला अस्मिता केंद्रे यांना अध्यक्षपद देण्याचे ठरवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT