राजापूर : सातबारा उताऱ्यावर पत्नीचे नाव दाखल करून फेरफार मंजूर करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी राजापूर तालुक्यातील महसूल विभागातील दोन महिला अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. तडजोडीनंतर २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदाराची मौजे जवळेथर येथे वडिलोपार्जित जमीन आहे. संबंधित जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर पत्नीचे नाव नोंद नसल्याने त्यांनी फेरफार मंजुरीसाठी अर्ज केला होता. यासंदर्भात १३ मे २०२६ रोजी मिळंद येथील तलाठी कार्यालयात तक्रारदाराने भेट दिली. त्यावेळी कोतवाल संजना नंदकुमार माने (वय ४१) यांनी मंडळ अधिकारी पूनम जससिंग गावीत (३७) यांच्यावतीने फेरफार मंजूर करून देण्यासाठी २५ हजारांची मागणी केल्याचे सांगितले.
तक्रारदाराने तत्काळ याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीने १४ मे रोजी पडताळणी केली असता, २० हजार रुपयांत व्यवहार निश्चित झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मिळंद तलाठी कार्यालयात सापळा रचण्यात आला. पंचासमक्ष कोतवाल संजना माने यांनी २० हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर त्यांनी मंडळ अधिकारी पूनम गावीत यांना दूरध्वनीवरून माहिती दिली असता त्यांनीही त्यास संमती दर्शविली. यानंतर एसीबीच्या पथकाने दोघींनाही ताब्यात घेतले.
पोलिस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मच्छिंद्र जाधव व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईनंतर महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून तालुक्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांकडून महसूल कार्यालयांमधील कामांसाठी लाच मागितली जात असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत असताना एसीबीच्या या कारवाईमुळे प्रशासनात धास्ती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे सामान्य जनतेमधून या कारवाईबद्दल समाधान व्यक्त होत आहे. मात्र संबंधितांवरून काय कारवाई होईल, याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे. दरम्यान, या दोघांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.