चिपळूण : तालुक्यातील खडपोली रामवाडी येथे वाशिष्ठी नदीच्या डोहात बुडून दोन महिला व एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (दि. 25) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेमध्ये लता शशिकांत कदम (वय 35), त्यांचा चिमुकला लक्ष्मण कदम (8) तसेच चिमुकल्याची आत्या रेणुका धोंडिराम शिंदे (45) यांचा बुडून मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी दुपारी कपडे धुण्यासाठी या दोन महिला खडपोली रामवाडी येथील वाशिष्ठी नदीच्या डोहात गेल्या असता त्यांच्याबरोबर असलेला चिमुकला लक्ष्मण हा आंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरला. याचवेळी तो पाण्यात बुडू लागला. आई लता यांच्या लक्षात येताच त्यांनी आपल्या मुलाला वाचविण्यासाठी डोहात उडी घेतली. यावेळी चिमुकल्याने त्यांना पाण्यात ओढले. हे दोघेही पाण्यात ओढले गेल्याचे लक्षात येताच रेणुका यांनी त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली आणि यामध्ये हे तिघेही या डोहात बुडाले.
उशिरापर्यंत तिघे घरी आले नाहीत म्हणून घरच्यांनी शोध सुरू केला. यावेळी त्यांना ही दुर्घटना घडल्याचे लक्षात आले. यानंतर ग्रामस्थांनी तत्काळ डोहाकडे धाव घेत डोहामध्ये तिघांचे शोधकार्य सुरू केले आणि त्यांचे मृतदेह बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, त्यापूर्वीच तिघांचे मृतदेह डोहातून बाहेर काढण्यात यश आले होते. शिरगाव पोलिस पुढील तपास करीत आहेत.