जालगाव : दापोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील समुद्रकिनारी दोन अज्ञात व्यक्तींचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. यातील एक मृतदेह आंजर्ले येथील गणपती विसर्जन पॉईंट समुद्रकिनारी सापडला, तर दुसरा केळशी समुद्रकिनारी सापडला आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास समुद्रकिनारी मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
आंजर्ले येथे सुमारे 50 वर्षे वयाचा टी-शर्ट परिधान केलेला, अर्धनग्न स्थितीतील पुरुषाचा मृतदेह सापडला आढळल्याची माहिती पोलिसपाटील जगदीश कलमकर यांनी दापोली पोलिस ठाण्यात दिली. तर केळशी येथील बापूआळी मागील समुद्रकिनारी सुरुबनानजीक वाळूत कुजलेल्या अवस्थेत सुमारे 50 वर्षे वयाचा?टी-शर्ट परिधान केलेला अर्धनग्न स्थितीतील पुरुष मृतावस्थेत सापडला. दोन्ही मृतदेहांची ओळख पटण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती दापोली पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश तोरस्कर यांनी दिली. दोन्ही मृतदेह मच्छीमारांचे असण्याची शक्यता असून, अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे. याबाबत पंचनामा करून प्रकरणाची पुढील चौकशी दापोली पोलिस करीत आहेत. या घटनांची आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.