चिपळूण : चिपळूण पोलिसांना टीडब्ल्यूजेच्या गुंतवणूकदारांनी असा घेराव घातला. Pudhari Photo
रत्नागिरी

TWJ Investors Protest | ‘टीडब्ल्यूजे’च्या गुंतवणूकदारांचा संचालकांना घेराव

पोलिस ठाण्यावर धडक; आरोपींना अटक न झाल्यास दिला आत्मदहनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : जिल्ह्यासह राज्यातील शेकडो गुंतवणुकादारांना गंडा घालणार्‍या टीडब्ल्यूजे कंपनी संचालकाविरोधात तक्रार देऊनही त्यांना अटक झाली नाही. परिणामी पैसे मागण्यास गेलेल्या गुंतवणूदारांवरच पोलिस तक्रारी केल्या जात आहेत. यामुळे संतापलेल्या गुंतवणूकदारांनी पोलिस ठाण्यावर धडक दिली. कंपनीच्या संचालकांना अटक का होत नाही, याचा जाब विचारला आणि चिपळूण पोलिस निरीक्षक यांना घेराव घातला. 31 डिसेंबर अखेर कंपनी संचालकांना अटक न झाल्यास पोलिस ठाण्यासमोरच आत्मदहन करण्याचा इशारा गुंतवणूकदारांनी दिला आहे.

कामथे (ता. चिपळूण) येथील प्रतिक दिलीप माटे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर टीडब्ल्यूजे कंपनीचा घोटाळा उघडकीस आला. कंपनी संचालक समीर नार्वेकर, त्याची पत्नी नेहा नार्वेकर, सहकारी संकेश रामकृष्ण घाग व सिद्धेश शिवाजी कदम या चौघांवर 28 लाख 50 हजार रूपयांच्या फसवणूक प्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर या कंपनी विरोधात राज्यभरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.

गुंतवणुकीची रक्कम काही दिवसात देतो, अशी आश्वासने सातत्याने देण्यात आली. मात्र फेब्रुवारी नंतर एकाही गुंतवणूकदारास एक कवडीही मिळाली नाही. दरम्यान गुन्हा दाखल झालेले समीर नार्वेकर, संकेश घाग यांचा ठावठिकाणा पोलिसांना लागलेला नाही. गुंतवणुकीची रक्म मिळण्यासाठी? ? गुंतवणूकदार संचालकांच्या आई-वडीलांच्या भेटी घेत आहेत. गुंतवणूकदार तगादा लावत असल्याने रामकृष्ण घाग यांनी चिपळूण पोलिसांत धमक्या मिळत असल्याची तक्रार दिली होती.

या घटनेची माहिती मिळताच गुंतवणूकदारांनी चिपळूण पोलिस ठाण्यात धडक दिली. पोलिस निरीक्षक? ? फुलचंद मेंगडे यांच्याकडे विचारणा केली. टीडब्ल्यूजे कंपनी संचालकाविरोधात तक्रार करूनही त्यांना अटक होत नसल्याचा मुद्दा गुंतवणूकदारांनी मांडला. त्यावर मेंगडे म्हणाले, या प्रकरणी आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडून तपास सुरू आहे. या तपासासाठी एसआयटीची स्थापना झाली असून त्यांनी कामाला सुरुवात देखील केली आहे. कंपनीची मालमत्ता ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. या सार्‍या प्रक्रियेला वेळ लागणार आहे.

त्यानंतर गुंतवणूकदार शैलजा चव्हाण पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, चिपळूणसह जिल्ह्यातील जवळपास 3000 लोकांनी जवळपास 300 कोटीहून अधिक गुंतवणूक या कंपनीत केलेली आहे. समीर नार्वेकर, संकेश घाग व त्यांच्या सहकार्‍यांनी विविध 11 प्रकारचे व्यवसाय कंपनी करत असल्याचे सांगितले होते. त्यानुसार कंपनीकडून 3 ते 4 टक्के परतावा मिळत होता. या कंपनीने 17 जिल्ह्यात कार्यालये थाटली आहेत. तेथूनही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे.

कंपनीकडे गुंतवणुकीची रक्कम मागितली असता ती देण्यास टाळाटाळ सुरू झाली. गुंतवणूकदारांना फेब्रुवारी 2025 पासून एक कवडी मिळालेली नाही. अनेकांनी कर्जे काढून, दागिणे गहाण ठेवून, तसेच साठवलेली पुंजी या कंपनीत गुंतवली. मात्र समीर नार्वेकर व त्यांच्या सहकार्‍यांनी गुंतवणूकदारांचा विश्वासघात करत हजारो कोटींचा घोटाळा केला आहे. कंपनीविरोधात तक्रार देऊनही संचालकांना अटक होत नाही.

यामध्ये पोलिस, राजकारणी, आमदार, खासदारांचाही सहभाग आहे. त्यामुळेच घोटाळेबाज संचालक पोलिसांना सापडत नाहीत. पोलिसांनी आम्हाला आदेश द्यावेत, आम्ही त्वरित त्याचा शोध घेऊन पोलिसांचा हवाली करू. पोलिसांनी कंपनी संचालकांना डिसेंबर अखेरपर्यत अटक न केल्यास पोलिस ठाण्यासमोरच आत्मदहनाचा इशारा गुंतवणूकदारांनी दिला. यावेळी मोठ्या संख्येने गुंतवणूकदार जमले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT