लांजा : लांजा तालुक्याच्या पूर्व भागाला जोडणार्या लांजा-कोर्ले या मुख्य मार्गावर सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास वादळी पावसाने सुरूचे मोठे झाड कोसळले. रस्त्याशेजारी असलेल्या बांधकाम शेडवर झाड कोसळल्याने स्थानिक रहिवाशाचे मोठे नुकसान झाले.
झाड पडल्याने लांजा-कोर्ले मार्गावर तासभर वाहतूक खोळंबली होती. यशवंत पाडावे असे या घटनेत नुकसान झालेल्या ग्रामस्थाचे नाव आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी पाहणी करून पडलेले झाड क्रेनच्या सहाय्याने बाजुला करुन मार्ग मोकळा करण्यात आल्यानंतर लांजा-कोर्ले मार्गावरील वाहतुक सुरळीत झाली. लांजा-कोर्ले मार्गावरून वाहनांची दिवस-रात्र कायम वर्दळ असते. मात्र, सोमवारी सकाळी वाहनांची वर्दळ नसल्याने सुदैवाने मोठा अपघात टळला.