गुहागर शहर : तालुक्याची आर्थिक राजधानी शृंगारतळी गेली अनेक वर्षे समस्यांच्या विळख्यात सापडली आहे. मुख्य बाजारपेठेतील पिकपशेड, ब्रिटिशकालीन पूल यांच्या उभारणीला अद्याप मुहूर्त नाही. तसेच पथदीप कर महामार्ग प्राधिकरणाने थकविलेला असल्याने बाजारपेठ अंधारात आहे.
या जोडीला गटारांची निकृष्ट कामे, वाहतूक कोंडी या सर्व समस्यांची अद्यापही सोडवणूक झालेली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरणात शृंगारतळी दरम्यान, रस्त्याच्या काँक्रीटला तडे जाणे, निकृष्ट गटारांचे काम, पुलांचे कठडे, भिंती यांची कामे व्यवस्थित झालेलीच नाहीत. काही ठिकाणी गटारे उघडी असल्यामुळे खासगी वाहनचालकांची वाहने रस्त्यालगतच उभी असतात. त्यातून मार्गक्रमण करताना पाय घसरून तोल जाऊन गटारात पडण्याचा मोठा धोका आहे. गटारात उभ्या असलेल्या लोखंडी सळ्यांमुळे फार मोठा जीवघेणा अपघात होवू शकतो. पावसाळा सुरु झाला तरी या गटारांचे काम पूर्ण झालेले नाही. रस्ता रुंदीकरणात अनेक पुलांची उभारणी झाली मात्र, पालपेणे फाट्यावरील ब्रिटिशकालीन पुलाची अद्याप उभारणी झालेली नाही.
रस्ता रुंदीकरणात बाजारपेठेतील पिकपशेड तोडण्यात आली. शृंगारतळी ही तालुक्याची आर्थिक राजधानी असून येथे नेहमीच ग्राहक, प्रवासी, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी यांची गर्दी होते. मात्र, पिकपशेड नव्याने बांधण्यात आलेली नसल्याने प्रवासी व शालेय मुलांना भर उन्हाळ्यात, पावसाळ्यात वाहनांची वाट पाहत उभे रहावे लागते. येथे पिकपशेड उभारणीसाठी आलेल्या अधिकारी व कामगारांना येथील काही व्यापार्यांनी पळवून लावले.
मोठा गाजावाजा करुन गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरणाच्या ठेकेदाराने शृंगारतळीत पथदिप बसवले होते. मात्र, त्याने वीजकर थकविल्याने बरेच महिने राजधानी शृंगारतळी अंधारात चाचपडत आहे. याविरोधात पाटपन्हाळे ग्रामपंचायत व तंटामुक्त समितीने तीव्र नाराजी व्यक्त करुन संबंधित ठेकेदाराला पत्र देऊन जाब विचारला आहे. पथदीपांचे मीटर हे मनीषा कन्ट्रक्शनच्या नावे आहे. रुंदीकरण होईपर्यंत देखभाल दुरुस्ती, पथदीप कर भरणे ठेकेदाराला बंधनकारक आहे. असे असताना ठेकेदाराने पथदीप कर थकवून पाटपन्हाळे ग्रामपंचायतीला अडचणीत आणले आहेच शिवाय नागरिक, प्रवासी, व्यापारी यांना अंधारात ठेवले आहे. तसेच महावितरणने वीज खंडित केली आहे व मीटरही काढून नेले आहे. शृंगारतळीत रात्री-अपरात्री वर्दळ असते. सातत्याने चोरी होण्याच्या घटना, रात्री उशिरापर्यंत सुरु राहणारी बाजारपेठ यामुळे गजबजलेले ठिकाण. असे असताना पथदीप बंद असल्याने मोठी गैरसोय व्यापार्यांसह प्रवासी, वाहनचालक यांची झाली आहे.
शृंगारतळीत वाहतूक कोंडी आता नेहमीचीच झाली आहे. रस्त्याच्या कडेने वाहने कशीही लावली जातात. संध्याकाळच्या प्रवासी ट्रॅव्हल बर्याचवेळ उभ्या असतात. गणेशोत्सवसारख्या मोठ्या सणांमध्ये तर वाहतूक कोंडीचा मोठाच बोजवारा उडतो. ही कोंडी सोडविणे कठीण जाते. कधी कधी रुग्णवाहिकेलाही पुढे मार्गक्रमण करणे जिकिरीचे बनते.