Police Pudhari
रत्नागिरी

Ratnagiri News : बॉम्बच्या धमकीनंतर रत्नागिरी न्यायालयात कडेकोट बंदोबस्त

चार सशस्त्र पोलिस तैनात, तपासणीनंतरच प्रवेश

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : राज्यातील २२ जिल्हा सत्र न्यायालयांना सोमवारी ई-मेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर मंगळवारी रत्नागिरी जिल्हा न्यायालयाच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली. सोमवारी केलेल्या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याने न्यायालयाचे नियमित कामकाज सुरू झाले; मात्र खबरदारीचा उपाय म्हणून प्रवेशद्वारांवर कडक तपासणी व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

वकील पक्षकारांना तपासणी नंतरच न्यायालयात प्रवेश दिला जात आहे.सोमवारी अज्ञाताने ई-मेलद्वारे रत्नागिरीसह राज्यातील २२ न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. या प्रकारानंतर पोलिस, बॉम्बशोधक-नाशक पथक श्वान पथकाने न्यायालय परिसराची कसून तपासणी केली. या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळे काही काळ विस्कळीत झालेले न्यायालयीन कामकाज उशिराने सुरू झाले होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मंगळवारी सकाळपासून न्यायालय परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. दोन्ही मुख्य प्रवेशद्वारांवर मेटल डिटेक्टर बसवण्यात आले असून, चार सशस्त्र पोलिस कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र गार्ड तैनात करण्यात आला आहे. न्यायालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जात आहे.

वकील, पक्षकार तसेच अन्य नागरिकांना मेटल डिटेक्टरमधून तपासणीनंतरच आत सोडले जात आहे. सोमवारच्या धमकीच्या ई-मेलमुळे न्यायालय परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, मंगळवारी वाढण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेमुळे न्यायालयीन कामकाज सुरळीत सुरू राहिले. धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सायबर पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT