चिपळूण : तालुक्यातील पिंपळी येथे वाशिष्ठी नदीमध्ये मासे पकडण्यासाठी गेेलेले तिघेजण नदीपात्रातील छोट्या बेटावर अडकले होते. रविवारी रात्री चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आपत्कालीन यंत्रणेने तिघांना सुखरूप नदीबाहेर काढण्यात यश मिळविले आहे. पती-पत्नी व पुतण्याचा यामध्ये समावेश होता. तिघेही दळवटणे राजवाडा येथील राहाणारे होते.
संतोष वसंत पवार (वय 40), पत्नी सुरेखा संतोष पवार (35) व पुतण्या ओंकार रवी पवार (17, सर्व रा. दळवटणे राजवाडा) हे तिघेजण पिंपळी येथील वाशिष्ठी नदीत चढणीचे मासे पकडण्यासाठी गेले होते. हवामान खात्याने पावसाचा अलर्ट दिला असताना देखील ते नदीपात्रात मासे पकडण्यासाठी गेले असता अचानक वाशिष्ठीचा पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यांना नदीबाहेर येता आले नाही. त्यामुळे या तिघांनी नदीतील एका छोट्या बेटावर आश्रय घेतला. सायंकाळपर्यंत पाणी ओसरेल आणि आपण बाहेर निघू असा त्यांचा अंदाज होता. मात्र, सूर्य मावळत आला तरी पाणी वाढतच होते. त्यामुळे हे तिघेही घाबरून गेले. अखेर ओंकार याने गावातील काही मित्रांना ही माहिती दिली. त्यानंतर या तिघांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. यानंतर चिपळूण आपत्कालीन यंत्रणा तसेच पोलिसांना ही माहिती कळविण्यात आली व सायंकाळी 7ः30 वाजण्याच्या सुमारास चिपळूण नगर परिषद, महावितरण, पोलिस आणि महसूल यंत्रणेची आपत्कालीन यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले. या पथकातील दोघांनी सुरुवातीला वाशिष्ठीत उतरण्याचा धोका पत्करला. दोरखंड घेऊन दोघेजण संबंधितांना वाचविण्यासाठी नदीपात्रात उतरले.
आपत्ती व्यवस्थापनमधील निखील पवार, अजय कदम, आकाश कदम व अन्य कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते व त्यांनी या तिघांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोयनेचे अवजल बंद करण्यात आले. एका बाजूला पावसाचा जोर असताना दुसर्या बाजूला रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, न.प.चे कर्मचारी यंत्रणेसह घटनास्थळी होते. सुरुवातीला ओंकार याला बाहेर काढण्यात यश आले. यानंतर पती-पत्नीला सुखरूप बाहेर काढण्यात आले. रात्री 10ः30 वाजण्याच्या सुमारास हे रेस्क्यू ऑपरेशन संपले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. यामध्ये आपत्कालीन यंत्रणेतील कर्मचार्यांनी मोठा सहभाग दाखविला आणि ऐन रात्रीच्यावेळी वाशिष्ठी नदीपात्रात या तिघांना वाचविण्यासाठी थरार पाहायला मिळाला.