चिपळूण : समीर जाधव
इंग्रज सत्तेपासून देश स्वतंत्र व्हावा म्हणून अनेक देशभक्तांनी प्राणाची आहुती दिली. हजारोंनी कारावास भोगला. या लढ्यात महाराष्ट्राचे भरीव योगदान होते. कोकण भूमीसुद्धा अग्रेसर होती. रत्नागिरी जिल्ह्याने स्वातंत्र्यलढ्याला अखिल भारतीय नेतृत्व दिले. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक तर महात्मा गांधींचे राजकीय गुरू गोपाळकृष्ण गोखले याच रत्नागिरी जिल्ह्याने दिले. हुतात्मा अनंत कान्हेरे, चिरनेर सत्याग्रहात बळी पडलेले केशवराज जोशी हे रत्नागिरी जिल्ह्यातीलच. जिल्ह्याचा स्वातंत्र्य चळवळीत मोठा इतिहास आहे. या बरोबरीने चिपळूणने देखील स्वातंत्र्य रणात उडी घेतली. 1930 साली झालेल्या मिठाच्या सत्याग्रहात चिपळूण तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिक सहभागी झाले आणि त्या लोकांना कारावासही सहन करावा लागला.
7 सप्टेंबर 1942 रोजी झालेल्या मिरवणुकीदरम्यान इंग्रजांच्या राजवटीतील पोलिस आणि चिपळुणातील स्थानिकांमध्ये दंगल उसळली. यामध्ये पोलिस जखमी झाले. या प्रकरणी आठ लोकांना जिल्हा न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. चिपळुणातील तत्कालीन काँग्रेसच्या क्रांतिकारकांनी मनाई असताना देखील मिरवणूक काढली होती. 7 सप्टेंबर 1942 रोजी दुपारी 2:30 वा. मिरवणूक हेलेकर नाक्याकडून गांधी चौकात आली. यावेळी या ठिकाणी युद्धविरोधी भाषण दिले. त्यानंतर शांतारामभाऊ तांबट यांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांवर हल्ला झाला. काही वेळाने दंगल थंडावली.