वैभव पवार
गणपतीपुळे : जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळेच्या विकासासाठी राज्य शासनाकडून गेली सात वर्ष प्रयत्न सुरु असून अद्यापही अनेक कामे रखडलेली आहेत. तर झालेली काही कामे दर्जाहीन आहे. त्यामुळे हा विकास आराखडा कधी पूर्ण होणार याकडे गणपतीपुळे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान २३ ऑगस्ट रोजी विकास आराखड्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक आयोजित केली आहे.
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सन२०१९मध्ये गणपतीपुळे विकास आराखड्याच्या कामांना प्रारंभ झाला होता. त्यावेळी १०२ कोटी २८ लाख ६१ हजारचा हा आराखडला मंजूर झाला होता. जिल्हाधिकारी विकास आराखड्याचे सनिंयत्रण अधिकारी म्हणून नियुक्त आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यकारी समितीही गठीत करण्यात आली होती.
या आराखड्यांतर्गत तीन टप्प्यात विकास कामे निश्चित करण्यात होती. यासाठी पहिला टप्पा तीन वर्षाचा निश्चित करण्यात आला होता. ३१ मार्च २०२२ पर्यंत हा आराखडा पूर्ण करण्यात यावा असे शासन निर्देश होते .परंतु कोरोना महामारीचा कालावधी वगळता त्यानंतर उर्वरित वर्षे आराखड्याची कामे रखडण्यातच गेली आहेत. तसेच अद्याप या विकास आराखड्याला गती मिळालेली नाही. त्यामुळे सात वर्षापूर्वी प्रारंभ झालेल्या हा विकास आराखडा मागील चार वर्षापासून रखडलेला आहे.
रत्नागिरीचे सध्याचे जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी गणपतीपुळे येथे विशेष बैठक घेऊन पर्यटन विकास आराखड्यातील कामे लवकरच मार्गी लावण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले.तसेच वाढत्या पर्यटक संख्येचा विचार करता पुढील २० वर्षांसाठी एक सर्व समावेशक मास्टर प्लॅन तयार करण्यात येईल असे देखील त्यांनी बैठकीत सांगितले. परंतु सद्यस्थितीत रखडलेला पर्यटन विकास आराखडा पूर्ण होण्याची गरज असताना जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील २० वर्षांसाठी आखलेल्या मास्टर प्लॅनचे काय होणार अशी चर्चा आता गणपतीपुळ्यात सुरु झाली आहे.
गणपतीपुळेचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी नवीन नळपाणी योजना आखण्यात आली. चाफे ते गणपतीपुळे मेन लाईनचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन अपूर्ण आहे. या घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत पर्यटन विकास आराखड्याचे निधीतून गणपतीपुळे ग्रामपंचायतीला दोन घंटागाड्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. तसेच रस्त्यांच्या कामांमध्ये आपटा ते शासकीय विश्रामगृह रस्ता काँक्रिटीकरण झाला आहे.
त्याचबरोबर मोरया चौक ते बँक ऑफ इंडिया पर्यंत रानडे रोड पूर्ण झाला आहे. परंतु संबंधित रस्त्यांना साईड गटाराचे काम झालेले नाही. या पर्यटन विकास आराखड्यातील तीन टप्प्यांमध्ये टप्पा क्रमांक एक मध्ये श्री क्षेत्र गणपतीपुळे गणपती मंदिराचे तसेच परिसर संबंधित आराखड्यातील कामे, श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे येणाऱ्या भाविकांना मूलभूत सुविधा पुरविणे, पाणीपुरवठा योजना व स्वच्छता संदर्भातील कामे, अधिक क्षमतेचे सार्वजनिक स्नानगृह व शौचालय बांधणे, पर्यटक व भाविकांना समुद्रस्नानाकरिता सुरक्षेसाठी समुद्र किनाऱ्यावर जागा आरक्षित करून बोयेज टाकणेबाबत अशी कामे प्रस्तावित होती. त्यानंतर टप्पा क्रमांक दोन मध्ये सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, वाहनतळ सौर ऊर्जा संकरित कामे तसेच टप्पा क्रमांक तीन मध्ये श्रीक्षेत्र गणपतीपुळे गावातील व परिसरातील रस्ते अशा स्वरूपात विकास आराखड्यातील कामांचा समावेश आहे. परंतु काही ठराविक कामे मार्गी लागल्याने विकास आराखडा नक्की कधी पूर्ण होणार याबाबत स्थानिक ग्रामस्थ अद्यापही प्रतीक्षेतच राहत आहेत. २३ रोजी दुपारी ३ वा. गणपतीपुळे तिर्थक्षेत्र विकास आराखड्याची आढावा बैठक आयोजित केली आहे.