चिपळूण : तालुक्यातील सावर्डे डेरवण फाटा येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात आयशर टेम्पोने होंडा ॲक्टिव्हा दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार शिक्षक गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डेरवण फाटा येथे रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आयशर टेम्पोने होंडा ॲक्टिव्हाला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकी टेम्पोच्या पुढील चाकाखाली अडकली. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. यामध्ये शंकर पाटील (रा. सावर्डा भुवडवाडी) हे प्राथमिक शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि सावर्डे पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी दुचाकीस्वाराला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.