रत्नागिरी : शहरानजीकच्या एमआयडीसी येथे व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्रीसाठी घेऊन आलेल्या संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. त्याच्याकडून अडीच कोटी रुपये किमतीची अडीच किलो वजनाची व्हेल माशाची उलटी आणि 50 हजारांची दुचाकी, असा एकूण 2 कोटी 50 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी (1 ऑगस्ट) रात्री 10.45 वाजण्याच्या सुमारास करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एजाज अहमद युसूफ मिरकर (वय 41, मूळ रा. पिंगी मोहल्ला मिरकरवाडा. सध्या रा. कदमवाडी कोकणनगर, रत्नागिरी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला एक जण व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी एमआयडीसी येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार, या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला होता.
रात्री 10.45 वा. सुमारास संशयित हा त्याठिकाणी व्हेल माशाची उलटी विक्री करण्याच्या उद्देशाने आपल्या ताब्यात बाळगून असताना या पथकाला आढळून आला. त्याच्या हालचालींवरुन पोलिसांनी संशयिताची चौकशी व तपासणी केली असता त्याच्याकडून हा मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणी संशयिताच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात वन्य जीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 39,42,43,44,48,51,57 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलिस अधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, पोलिस उपनिरीक्षक संदीप ओगले, पोलिस हेड काँस्टेबल विजय आंबेकर, दीपराज पाटील, विवेक रसाळ, गणेश सावंत व चालक पोलिस काँस्टेबल अतुल कांबळे यांचा समावेश असलेल्या पथकाने केली.
‘फ्लोटिंग गोल्ड’ म्हणूनही ओळख
व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) हे ‘फ्लोटिंग गोल्ड’ या नावानेही ओळखले जाते. ते व्हेल माशाच्या जठरामधून उलटीद्वारे बाहेर पडून किनार्यावर येते. याचा वापर महागडी अत्तरे बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे अत्तरांचा सुगंध दीर्घकाळ टिकण्यास मदत होते. आंतरराष्ट्रीय बाजारात व्हेल माशाच्या उलटीला मोठी मागणी असून, तिची किंमत कोटीत मिळत असल्याने त्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होताना दिसते.