रत्नागिरी : कोकणच्या समुद्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर एलईडी मासेमारीसह अन्य अवैध मासेमारीविरोधातील कारवाया अधिक तीव्र करा. कारवाई केलेल्या नौकांकडील दंडाची वसुलीही प्रभावीपणे करा, अशा सक्त सूचना मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे यांनी मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शुक्रवारी मुंबई येथे कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्तांची आढावा बैठक झाली. त्यामुळे अवैध मासेमारीविरोधातील कारवायांना वेग येण्याची शक्यता आहे. काही नौकांकडून प्रकाशझोताचा वापर करून मासेमारी केली जाते.
प्रकाशाकडे मासळी आकर्षित करून मोठ्या प्रमाणात पकडण्याची ही पद्धत राज्यात प्रतिबंधित आहे. तसेच पर्ससीन नेट मासेमारी नौकांना महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत १२ नॉटिकल मैलांच्या आत मासेमारी करण्यास परवानगी नाही. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नौकांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मत्स्य व्यवसाय आयुक्तपदाचा भानुदास पालवे यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्तांची पहिलीच आढावा बैठक मुंबईतील कार्यालयात घेतली. या बैठकीत मत्स्यव्यवसाय विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचाही आढावा घेण्यात आला.
यावेळी एलईडी मासेमारीसह अन्य प्रकारची बेकायदेशीर मासेमारी रोखण्यासाठी नियमित आणि प्रभावी कारवाया करण्याचे निर्देश पालवे यांनी दिले. आता आयुक्त स्तरावरूनही कारवाई आणि दंडवसुलीबाबत स्पष्ट निर्देश मिळाल्याने कोकण किनारपट्टीवरील अवैध मासेमारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.