आरवली : एसटी महामंडळाने प्रवासातील सवलतींची प्रक्रिया पारदर्शक आणि डिजिटल करण्यासाठी सुरू केलेली नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड स्मार्ट कार्ड योजना रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात प्रभावीपणे राबविता येत नसल्याचे चित्र समोर आले आहे.
मोबाईल नेटवर्कच्या अभावामुळे कंडक्टरच्या इलेक्ट्रॉनिक तिकीट यंत्रावर कार्ड स्कॅन होत नसल्याने कार्डमध्ये पैसे असतानाही प्रवाशांना खिशातून रोख रक्कम देऊन तिकीट घ्यावे लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून या योजनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एसटी महामंडळाने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आदी प्रवाशांच्या सवलती डिजिटल पद्धतीने देण्यासाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू केली. कार्डमध्ये आगाऊ रक्कम भरल्यानंतर कंडक्टरच्या मशिनवर कार्ड टॅप करून तिकीट मिळण्याची सुविधा देण्यात आली. मात्र, या योजनेचा पाया असलेली इंटरनेट जोडणीच अनेक ग्रामीण भागात उपलब्ध नसल्याने योजना अडचणीत आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, संगमेश्वर, लांजा, राजापूर, खेड आदी तालुक्यांतील डोंगराळ व दुर्गम मार्गांवर मोबाईल नेटवर्कची समस्या गंभीर आहे. इंटरनेट उपलब्ध नसल्याने कंडक्टरच्या मशिनवर व्यवहार पूर्ण होत नाहीत. परिणामी, कार्डमधील रक्कम वापरता येत नसल्याने प्रवाशांना पुन्हा रोख पैसे देऊन तिकीट घ्यावे लागते. अनेक प्रवाशांनी स्मार्ट कार्डमध्ये ५०० ते १,००० रुपयांपर्यंत आगाऊ रक्कम जमा केली आहे. मात्र प्रत्यक्ष प्रवासावेळी कार्ड निष्क्रिय ठरत असल्याने त्यांच्या पैशांचा उपयोग होत नसल्याची तक्रार आहे.
ज्येष्ठ प्रवासी अजीज वागळे म्हणाले, "आम्ही कार्डमध्ये ८०० रुपये भरले; पण गावाकडच्या मार्गावर मशिनच चालत नाही. त्यामुळे रोज खिशातून तिकीट काढावे लागते. मग या कार्डचा उपयोग तरी काय?"या परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील प्रवाशांमध्ये असंतोष वाढला आहे.
शहरांमध्ये नेटवर्क उपलब्ध असल्याने योजना काही प्रमाणात यशस्वी होत असली तरी जिल्ह्यातील मोठा ग्रामीण भाग अद्यापही मोबाईल नेटवर्कच्या मर्यादांशी झुंज देत आहे. त्यामुळे आधी नेटवर्क सुविधा सक्षम कराव्यात आणि त्यानंतरच डिजिटल योजना सक्तीने राबवाव्यात, अशी मागणी होत आहे. या समस्येचा फटका कंडक्टरनाही बसत आहे. मशिन चालत नसल्याने प्रवाशांचा रोष त्यांच्यावरच निघत असून वरिष्ठांच्या सूचनांमुळे आणि प्रवाशांच्या नाराजीमुळे तेही अडचणीत सापडले आहेत.
प्रवाशांचे म्हणणे आहे की, कार्डमध्ये पैसे जमा करूनही त्याचा वापर करता येत नसेल, तर ती योजना व्यवहार्य ठरत नाही. त्यामुळे नेटवर्क सुविधा पूर्णपणे उपलब्ध होईपर्यंत ग्रामीण भागात स्मार्ट कार्ड योजना ऐच्छिक ठेवावी आणि पारंपरिक तिकीट पद्धत सुरू ठेवावी, अशी मागणी जोर धरत आहे. पर्यटन, शिक्षण आणि दैनंदिन प्रवासासाठी एसटीवर अवलंबून असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात डिजिटल सुविधांबरोबरच पायाभूत दूरसंचार व्यवस्था सक्षम करणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. "आधी नेटवर्क, मग डिजिटल" हीच आता ग्रामीण भागातील प्रवाशांची प्रमुख मागणी बनली आहे.