रत्नागिरी ः काही महिन्यांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात इन्स्टाग्रामवरील लव्ह स्टोरीने एक मुलगी परराज्यातून तर दुसरी एक युवती सिंधुदुर्ग जिल्ह्यातून रत्नागिरीत दाखल झाली. या दोन्ही मुली अल्पवयीन होत्या. सोशल मीडियाचा पगडा असलेल्या युवा पिढीसाठी ही घटना खूप काही शिकवून गेली होती. मात्र अशा घटनांपासून बोध घेणार कोण? हा खरा प्रश्न आहे. इन्स्टासह सोशल मीडियावरील अनेक कारनामे कुणाच्या आयुष्याचा खेळ करत आहेत. कलहासाठी कारणीभूत ठरत आहेत, तर कुणाचा जीव घेत आहेत. हे वास्तव आता नव्याने समोर येऊ लागले आहे.
चेष्टा मस्करीच्या नादात एखाद्याच्या आयुष्याचा खेळ खल्लास होऊ शकतो. आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडत आहेत. काही उजेडात येतात तर काही सामाजिक बदनामीच्या भीतीपायी दाबल्या जातात पण त्यामुळे सोशल मीडियाच्या वापराचे अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहेत. सोशल मीडियामुळे जग जवळ आले असले तरी नाती दुरावू लागली आहेत. अनेकजण ऑनलाईन राहून आभासी जगात राहत आहेत. नात्यातील ओलावा कमी झाल्याने कुटुंबे फुटू लागली, नाती तुटू लागली. सोशल मीडियाचा अतिरेक हा फसवणूक, गुन्हे यापुढे जाऊन आता जीवघेणा ठरू लागला आहे.. त्यामुळे खर्या आयुष्यात डोकावून समाजाने आभासी दुनियेतून बाहेर पडण्याची गरज निर्माण झाली आहे.
या आभासी जगाचा फटका फक्त तरुण- तरुणींनाच बसतोय असे नाही, तर शाळकरी मुले, विवाहित स्त्री-पुरुषही त्याचे शिकार होऊ लगले आहे. कायम ऑनलाईन राहिल्याने अनेक पोस्ट लाईक करणे, फॉरवर्ड करणे, स्क्रीन टाईम वाढणे याचा वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम होत आहे. टाईमपास म्हणून चालू असलेला खेळ अनेकांच्या आयुष्याचा खेळखंडोबा करत आहे. नको त्या कारणांवरून कौटुंबिक कलह वाढू लागले आहेत. अनेक विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होत आहे. या घटना कुटुंब व्यवस्था धोक्यात आणू लागल्या आहेत. संशयकल्लोळ आयुष्याचा खेळ करू लागला आहे. खरंच सोशल मीडियाची माणसाच्या आयुष्यात गरज आहे का? याचा विचार करण्याची गरज आहे.