चिपळूण : स्मार्ट मीटरविरोधात खेर्डी येथे महावितरणच्या अधिकार्‍यांना निवेदन देताना आ. भास्कर जाधव. सोबत बाळा कदम, विक्रांत जाधव, महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते.  (Pudhari File Photo)
रत्नागिरी

Smart Meter Protest | स्मार्ट मीटरविरोधात महाविकास आघाडीचा जनआक्रोश मोर्चा

जबरदस्ती सहन करणार नाही : आ. भास्कर जाधव

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण शहर : या सरकारचे करायचे काय, ...खाली डोकं वरती पाय, ...जुलमी सरकार हाय-हाय, महावितरणचा निषेध असो, प्रिपेड मीटरच्या निर्णयाचा धिक्कार असो... बंद करा बंद करा... स्मार्ट मीटर बंद करा.. अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या जनआक्रोश मोर्चाने मंगळवारी (दि. 7) खेर्डी गाव दणाणून सोडले. स्मार्ट मीटरची सक्ती ताबडतोब बंद करावी; अन्यथा योग्य तो बंदोबस्त केला जाईल, असा स्पष्ट इशाराच यावेळी आ. भास्कर जाधव यांनी महावितरणला दिला.

विजेचे जुने मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचा सपाटा सर्वत्र सुरू असून त्याला विरोध देखील होत आहे. परंतु त्या विरोधाला न जुमानता महावितरणचे ठेकेदार बिनदिक्कत स्मार्ट मीटर बसवत आहेत. त्यामुळे विजेचे बिल दुप्पट व तिप्पट येत असल्याने नागरिकांची मोठी ओरड होत आहे. त्याची दखल घेत चिपळूण युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते यांनी पुढाकार घेत जनआक्रोश मोर्चाची हाक दिली होती. त्याला खेर्डी आणि पेढे जिल्हा परिषद गटामधील महाविकास आघाडीने जोरदार प्रतिसाद दिला आणि मंगळवारी जनआक्रोश मोर्चा थेट खेर्डी येथील महावितरण कार्यालयावर धडकला.

उबाठा शिवसेना नेते व आ. भास्कर जाधव या मोर्चात सहभागी झाले होते तर शिवसेना उबाठा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाकत शाह, माजी जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव, उबाठा शहरप्रमुख सचिन उर्फ भैय्या कदम, उपतालुका प्रमुख सचिन शेट्ये, विभागप्रमुख विजय शिर्के, काँग्रेसचे उप तालुकाध्यक्ष सुबोध सावंतदेसाई, राष्ट्रवादी शरद पवार गट उपतालुका प्रमुख सुनिल गुरव, विभागप्रमुख राम डिगे, युवतीसेना तालुका अधिकारी शिवानी खताते, युवा सेना शहर प्रमुख पार्थ जागुष्टे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, हा मोर्चा खेर्डी महावितरण कार्यालयाच्या समोर येताच पुन्हा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने महावितरण अधिकार्‍यांची भेट घेऊन आपल्या मागण्याचे निवेदन देत स्मार्ट मीटरला तीव्र विरोध दर्शवला. यापुढे एकही प्रीपेड मीटर बसवता कामा नये, तसेच जे स्मार्ट मीटर जबरदस्तीने लावण्यात आले आहेत ते तत्काळ काढण्यात यावेत, कोणत्याही ठिकाणी जबरदस्ती करून आणि बंद असलेल्या घरांना मीटर बसवले गेले तर महाविकास आघाडी ते सहन करणार नाही असा स्पष्ट इशाराच यावेळी देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT