रत्नागिरी : शहरातील माळनाका येथील स्कायवॉकवरील आर्ट गॅलरीच्या कामासाठी शहरातील मुख्य रस्ता दिवसा बंद ठेवण्याऐवजी ठेकेदाराने रात्रीच्या वेळी काम करावे अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री ना. उदय सामंत नगर पालिका प्रशासन, ठेकेदार यांनी केलेल्या असतानाच, पालकमंत्र्यांचे आदेश धुडकावून लावत अवघ्या २४ तासांत मुख्य रस्ता दिवसाढवळ्या बंद केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नगर पालिका आणि पोलिसांच्या या मनमानी कारभारामुळे मारुती मंदिर ते माळनाका परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून, नागरिकांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे.
रत्नागिरी शहराचे वैभवात भर घालणाऱ्या स्कायवॉकवर सध्या आर्ट गॅलरीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी रस्ता दोन दिवस पूर्णपणे बंद ठेवावा, अशी मागणी संबंधित ठेकेदाराने केली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी प्रत्यक्ष येऊन या कामाचा आढावा घेतला होता. यावेळी जनतेला कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी पालकमंत्र्यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली होती. "रस्ता बंद करून जनतेला त्रास देऊ नका. ठेकेदाराने रात्री १० ते पहाटे ६ या वेळेत काम करावे, कारण या वेळी वाहनांची वर्दळ कमी असते. दिवसा रस्ता बंद करून वाहतूक कोंडी होऊ देऊ नका आणि नागरिकांना वेठीस धरू नका," अशा सक्त सूचना पालकमंत्र्यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत दिल्या होत्या.
मात्र, पालकमंत्र्यांच्या या आदेशाला २४ तास उलटत नाहीत तोच, रत्नागिरी नगर पालिका आणि पोलिसांनी ठेकेदाराच्या दबावासमोर किंवा सोयीनुसार नरमाईची भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले. मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अचानक शहरातील मारुती मंदिर येथून माळनाक्याकडे जाणारा मार्ग पोलिसांनी पूर्णपणे बंद केला. यानंतर पर्यायी व्यवस्था म्हणून वाहतूक छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमकडून थिबा पॅलेसमार्गे वळवण्यात आली. अचानक झालेल्या या वाहतूक बदलामुळे मारुती मंदिर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली व वाहनचालकांची गैरसोय झाली.
पालकमंत्री यांनी थेट निर्देश देत असताना आणि जनतेला त्रास होऊ नये म्हणून रात्री काम करण्याचे आदेश दिले असताना, नगर पालिका आणि पोलिस यंत्रणा मात्र ठेकेदाराच्या तालावर नाचत असल्याचे या घटनेवरून दिसून आले. प्रशासनाच्या या मनमानी कारभारावर आता वरिष्ठ पातळीवरून काय कारवाई होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.