मालवण : धुरीवाडा येथील काळुजी सदाशिव कांदळगावकर यांच्या ‘रामेश्वर ऑटो गॅरेज’ला शनिवारी मध्यरात्री अचानक लागलेल्या भीषण आगीत गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी ठेवलेल्या १५ दुचाकी आणि कांदळगावकर यांची स्वतःची कार जळून पूर्णपणे खाक झाली आहे. या दुर्दैवी घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
मध्यरात्री या गॅरेजमधून आगीच्या ज्वाला दिसू लागल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान, मालवण नगरपालिकेच्या ‘बुलेट फायर फायटर' घटनास्थळी दाखल झाल्यावर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत आगीने गॅरेजमधील सर्व १५ दुचाकी व कार भस्मसात केली.
नगरपालिकेचा मुख्य अग्निशामक बंब वेळेवर उपलब्ध न झाल्याबद्दल नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला. नगराध्यक्षा ममता वराडकर, नगरसेवक मंदार केणी, सुदेश आचरेकर, ललित चव्हाण आणि नगरसेविका पूनम चव्हाण यांनी मध्यरात्रीच घटनास्थळी धाव घेतली आणि पीडित गॅरेज मालक कांदळगावकर यांना धीर दिला. मालवण पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी जात घटनेचा पंचनामा केला. आग शॉर्टसर्किटमुळे लागली की, यामागे इतर काही कारण आहे, याचा तपास पोलिस करत आहेत.
अग्निशामक बंब मार्च २०२६ पासून बंद
अग्निशामक सेवा ही अत्यावश्यक सेवा आहे. पर्यटननगरी असलेल्या मालवणसारख्या शहरात अग्निशामक बंब दीर्घकाळ बंद राहणे ही गंभीर बाब आहे. केवळ मोटार दुरुस्तीसारख्या किरकोळ कारणामुळे संपूर्ण यंत्रणा ठप्प राहणे ही प्रशासनासाठी नामुष्कीची बाब आहे. पालिकेचा अग्निशामक बंब मार्च २०२६ पासून बंद असून, त्याच्या दुरुस्ती किंवा पर्यायी बंब उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिकेने १७ एप्रिल २०२६ रोजी जिल्हा प्रशासनाला पत्रही पाठविले होते. यावरून हा प्रश्न तीन ते चार महिन्यांपासून प्रलंबित असल्याचे स्पष्ट होते. याबाबत उबाठा शिवसेनेच्या नगरसेविका तपस्वी मयेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.