मालवण : सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने निवती समुद्रात अवैध एलईडी मासेमारीचे साहित्य असलेली गोवा राज्यातील नौका ताब्यात घेतली. नौकेवर नौका तांडेलसह 20 खलाशी असून सदर नौका जप्त करून पुढील कारवाईसाठी सर्जेकोट बंदरात आणली आहे.
सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवार 4 एप्रिल रोजी पहाटे 3.45 वा. च्या सुमारास निवती समुद्रात मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर, सहा.मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर हे नियमित गस्त घालत होते. यावेळी गोवा राज्यातील पल्लवी साईहर्षद धोंड (रा. पणजी गोवा) यांची नौका जय बॉस ही राज्याच्या जलधीक्षेत्रात मासेमारी करताना निदर्शनास आली. पाठलाग करून नौकेची तपासणी केली असता नौकेवर कोणतीही विधीग्राह्य कागदपत्रे आढळली नाहीत. तसेच नौकेवर एलईडी मासेमारीचे अवैध साहित्य आढळले.
या नौकेवर नौका तांडेलसह इतर 20 खलाशी होते. अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर, सहा.मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर यांनी सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक यांचे सहकार्याने सहा.आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे.