गुहागर : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शृंगारतळी बाजारपेठेमधील ओंकार ज्वेलर्स दुकान फोडीचा प्रयत्न करणाऱ्या चार संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी यांनी मुंबई येथून ताब्यात घेतले आहे.
तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या शृंगारतळी बाजारपेठेमध्ये गुहागर-विजापूर मुख्य मार्गावरील ओंकार ज्वेलर्स दुकान 17 फेब्रुवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा व त्यामधून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. दुकानाच्या पहिल्या शटरचे टाळे तोडण्यात त्यांना यश आले. मात्र, दुसऱ्या शटरचे टाळे त्यांना तोडता आले नाही. यातच सीसीटीव्हीवर काळा रंग फासून आपला गुन्हा लपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दुसऱ्या शटरचे टाळे न तुटल्याने त्यांना दागिन्यांची चोरी करता आली नाही. मात्र, चोरी झाली नसली तरी दुकानाचे शटर तोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला म्हणून अज्ञात आरोपींविरोधात गुहागर पोलिस ठाण्यामध्ये दुकान फोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.