श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या शिमगोत्सवास प्रारंभ 
रत्नागिरी

Karanjeshwari Temple : श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या शिमगोत्सवास प्रारंभ

सुवर्ण मुखवट्याचे आकर्षण, दर्शनासाठी गर्दी; पुणे - मुंबईतील चाकरमान्यांची आवर्जून भेट

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : ढोल-ताशाचा गजर व श्री देवीचा जयजयकार करत शहरातील गोवळकोट-पेठमापवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या शिमगोत्सवास शनिवारपासून प्रारंभ झाला. विशेष म्हणजे यावर्षी श्री देवी करंजेश्वरी देवीच्या मूर्तीचा मुखवटा 900 ग्रॅम सोन्याचा बनवण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांसाठी हा शिमगोत्सव उत्सुकतेचा बनला आहे. यानिमित्ताने सजावट, रांगोळी, देखावे उभारण्यात आल्याने या उत्सवात वेगळीच रंगत आली आहे.

शहरातील गोवळकोट येथील गोविंदगडाच्या पायथ्याशी व निसर्गाच्या सानिध्यात श्री देवी करंजेश्वरी व श्री देव सोमेश्वर देवस्थानचे मंदिर वसले आहे. आठव्या शतकातील हे देवस्थान आहे. सलग चार दिवसांचा शिमगोत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने व शांततेत गुलाल विरहीत साजरा केला जातो. शेरणे कार्यक्रमामुळे या देवस्थानचा शिमगोत्सव संपूर्ण कोकणात प्रसिद्ध आहे. त्यामुळे या उत्सवाला पुणे-मुंबईतील चाकरमान्यांसह अगदी परदेशी पाहुणेही आवर्जून भेट देतात. यावर्षी शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी केली आहे. गोवळकोट व पेठमाप भागात जागोजागी सजावट केली आहे. काही ठिकाणी देखावेही उभारण्यात आले आहेत. याशिवाय पेठमाप येथे वाशिष्ठी नदी किनाऱ्यावर यात्रोत्सवाची तयारी देखील जोरदार सुरू झाली आहे.

शहरातील गोवळकोट येथील मंदिरापासून मिरवणुकीने शनिवारी 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता या शिमगोत्सवास प्रारंभ झाला. यावेळी मंदिराभोवती पाच प्रदक्षिणाचा झाल्या. त्यानंतर मंदिरापासून मशिदीपर्यंत पालखी मिरवणूक सुरू झाली. यानिमित्त देऊळवाडी, सहाणवाडी, हरवडेवाडी येथील भाविकांच्या आरत्या स्वीकारत ही मिरवणूक काढण्यात आली. यानंतर मशिदभेटचा अनोखा कार्यक्रम झाला. चौघुले कुटुंबीयांतर्फे मानाची आरती स्वीकारून हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा जपली. पालखी पुन्हा मागे वळवून सहाणवाडी येथे होम लावण्यात आला. श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या दोन्ही पालख्यांचे गोविंदगडावर श्री देवी रेडजाई देवस्थानच्या भेटीचा कार्यक्रम पाहून भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. याठिकाणी मानकरी जगताप कुटुंबियांतर्फे पूजा झाली व त्यानंतर पालखीचे पेठमापच्या दिशेने प्रयाण झाले. दोन्ही पालख्या पेठमापवासीयांच्या आरत्या स्वीकारत दुसऱ्या दिवशी रविवारी 1 मार्च रोजी पहाटे होम लावून दोन्ही पालख्या पेठमाप येथील सहाणेवर विराजमान होतील. याठिकाणी देवीची ओटी भरण्याचा व रात्री करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे.

त्यानंतर 2 मार्च रोजी दुपारी 3 वाजल्यापासून या शिमगोत्सवातील प्रसिद्ध शेरणे कार्यक्रम होईल. सायंकाळी 6 वाजता वाजतगाजत या दोन्ही पालख्यांचे गोवळकोटच्या दिशेने प्रयाण होणार आहे. 3 मार्च रोजी पहाटे गोवळकोट सहाणवाडी येथे होम लावून तेथील सहाणेवर विराजमान होतील. येथेही देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता मिरवणुकीने पालख्या मंदिरात नेऊन शिमगोत्सवाची सांगता होणार आहे.

उद्या शेरणे कार्यक्रम

श्री देव सोमेश्वर आणि श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या शिमगोत्सवातील व कोकणातील प्रसिद्ध शेरणे कार्यक्रम 2 मार्च रोजी दुपारी 3 वाजता पेठमाप येथे होणार आहे. यानिमित्त पेठमाप भाटण येथे वाशिष्ठीनदी किनाऱ्यावर विविध दुकाने व खेळणी मांडली आहेत. यात्रोत्सवाची जय्यत तयारी केली आहे. विविध ठिकाणाहून भाविक याठिकाणी शरणे लपवण्यासाठी येतात. मनात नवस बोलून लपवलेली शेरणी देवीने शोधून काढली तर भाविकांची मनोकामना पूर्ण होते अशी श्रद्धा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT