मार्लेश्वर-गिरिजा विवाह सोहळा जल्लोषात 
रत्नागिरी

Marleshwar Temple : मार्लेश्वर-गिरिजा विवाह सोहळा जल्लोषात

लाखो भक्तांच्या साक्षीने ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमला सह्याद्रीचा कडीकपारा

पुढारी वृत्तसेवा

देवरुख : सनई सुरांच्या मधुर आवाजामध्ये व मंगलाष्टकांच्या मंजूळ स्वरांनी श्री देव मार्लेश्वर व श्रीदेवी गिरिजा यांचा कल्याण विधी (विवाह) सोहळा बुधवारी दुपारी लाखो भाविकांच्या साक्षीने उत्साहात पार पडला. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने सह्याद्रीचा कडीकपारा दुमदुमला.

प्रतिवर्षी विवाह सोहळा मकर संक्रांती दिनी दुपारी 12 ते 1 या वेळेत होतो. मात्र यावर्षी हा सोहळा दुपारी 3.41च्या शुभमुहूर्तावर पार पडला. सूर्यग्रहाने दुपारी 3 नंतर मकर राशीमध्ये प्रवेश केल्यामुळे यावर्षी देव मार्लेश्वर-देवी गिरिजा विवाह उशिराने करण्यात आला. असा योग तब्बल 12 वर्षांनी आल्याचे मानकर्‍यांनी सांगितले.

मकरसंक्रांतीदिनी आद्य मार्लेश्वर आंगवली मठातून देवाची पालखी गुहेतील गाभार्‍यापर्यंत आणण्यात आली. पालखीसमवेत पाटगावचे मठपती, लांजा वेरवली मराठे, मुरादपूरचे भोई, चर्मकार मशालजी, मारळचे सुतार, अबदागीर, कासार कोळवणचे ताशेवाले, चौरी न्हावी, असा मानकर्‍यांचा जमाव आला. पालखीतून आणलेला चांदीचा टोप देवाच्या पिंडीवर बसविण्यात आला. बुधवारी साखरपा गावातून वधू देवी गिरिजामातेची पालखी मार्लेश्वर शिखराकडे आणण्यात आली. या पालखीसोबत यजमान शेट्ये, परशेट्ये, जंगम, पुजारी आणि मानकरी आले होते. कल्याणविधी सोहळ्याचे यजमान असलेली देवरूख नजीकची श्री व्याडेश्वराची पालखी मंगळवारी रात्री मार्लेश्वर शिखराकडे आणली. मार्लेश्वर तीर्थ क्षेत्राच्या पायथ्याजवळ पवई येथे तिन्ही पालख्या एकत्र आल्या. यावेळी आंबव, लांजा तसेच मुरादपूर येथील दिंड्याही आनंदाने सामील झाल्या. महत्त्वाच्या कल्याण विधीप्रसंगी तिन्ही पालख्या एकत्र आणल्या. यावेळच्या करवलीचा मान प्रथेप्रमाणे गोठणे पुनर्वसन गावातून बजावण्यात आला.

लांजा मठाधिपतींच्या अधिपत्या खाली मार्लेश्वर देवाचा टोप आंगवलीचे आणेराव, तर गिरिजा देवीचा टोप साखरप्याचे शेट्ये यांनी मांडीवर घेतला होता. रायपाटणकर स्वामी यांच्या उपस्थितीत कल्याणी विधी सोहळा झाला. यापूर्वीच सकाळी नवरदेवाला बघण्याचा कार्यक्रम, वधूला मागणी घालणे, यानंतर साखरपुडा व विवाहाचा मुहूर्त काढणे असा विधी पार पडला. यानंतर ठरलेल्या मुहूर्तावर कल्याण विधी सोहळा सुरू झाला. जंगम स्वामी व पुजार्‍यांच्या मंत्रघोषाने पंचकलशपूजन करून सर्व मानकर्‍यांच्या हुकु मानुसार मंगलाष्टके झाली. यानंतर ‘हर हर महादेव’चा गजर उपस्थित भक्तांनी केला. ढोल-ताशे व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. विवाहानंतर देव वधू-वरांना आहेर देण्यात आला. महाप्रसादाचे वाटप झाले. रात्री साक्षी विडे भरून कल्याण विधी सोहळ्याची सांगता झाली. भक्तांनी देवाला गार्‍हाणी घालून येथील करंबेळीच्या डोहात हळदीबांगड्या व फुलांची परडी सोडण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT