रत्नागिरी : शिवसेनेच्या वतीने रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महिनाभरात एक लाख सदस्य नोंदणी केली जाणार असल्याचे रत्नागिरी विधानसभेचे आमदार आणि राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेना नेते उदय सामंत यांनी सांगितले. सदस्य नोंदणी झाल्यानंतर पक्षीय पातळीवर निवडणुका होऊन पदाधिकार्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी विधानसभा मतदार संघामध्ये एक लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे ना. सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मागील महिनाभरात ग्रामीण भागात 18,900हून अधिक तर शहरी भागात चार हजार सदस्यांची नोंदणी आतापर्यंत करण्यात आली आहे. सदस्य नोंदणीबाबत माजी नगरसेवक, माजी पदाधिकारी यांच्या बैठका घेण्यात आल्या असून, त्यांना सदस्य नोंदणीबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागामधून सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागात अजून साठ हजार तर शहरी भागात 10 हजार आणखी सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मतदार संघात शिवसेनेची सर्वाधिक सदस्य नोंदणी असेल, असेही त्यांनी सांगितले. रत्नागिरीसह जिल्ह्यामध्येही सदस्य नोंदणी सुरू असल्याची माहिती दिली.
पुढील महिनाभरात सदस्य नोंदणी मोहीम संपल्यानंतर पक्षीय पातळीवर निवडणुका घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी निवडणूक अधिकारीही नियुक्त केले जाणार आहे. या निवडणुकांमधून तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख व अन्य पदाधिकार्यांच्या नियुक्त्या होणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.