समीन मिरकर, रेहान सोलकर.  Pudhari File Photo
रत्नागिरी

‘त्या’ दोन तरुणांची समुद्री चाच्यांकडून सुटका

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : पश्चिम आफ्रिकेच्या किनार्‍यावर सुमारे महिनाभरापूर्वी समुद्री चाच्यांनी कॅमेरून देशाच्या हद्दीतून प्रवास करणार्‍या जहाजावरून अपहरण केलेल्या सात भारतीय खलाशांची अखेर सुखरूप सुटका झाली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दोन तरुणांचा समावेश असून, त्यांच्या सुटकेमुळे कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

एमव्ही बिटू रिव्हर नावाचे डांबर (बिटुमेन) वाहतूक करणारे जहाज कॅमेरूनमधील डुआला बंदराकडे निघाले होते. पश्चिम आफ्रिकेच्या सागरी हद्दीत पोहोचल्यावर समुद्री चाच्यांनी 17 मार्च 2025 रोजी जहाजावर हल्ला चढवून ते ताब्यात घेतले आणि जहाजावरील सात भारतीय खलाशांचे चाच्यांनी अपहरण केले. यामध्ये रत्नागिरी शहरातील भाटकरवाडा येथील समीन जावेद मिरकर आणि कर्ला येथील रेहान शब्बीर सोलकर या दोन तरुणांचा समावेश होता. इतर खलाशी तामिळनाडू आणि केरळ येथील होते.

गेला महिनाभर हे सर्वजण समुद्री चाच्यांच्या कैदेत होते. या घटनेने रत्नागिरीतील मिरकर आणि सोलकर कुटुंबीयांवर चिंतेचे सावट पसरले होते. या अपहरणाच्या घटनेची केंद्र सरकारच्या परराष्ट्र विभागाने गंभीर दखल घेतली होती. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत, मत्स्योद्योगमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे यांचेशी त्या दोघांच्या सुटकेबाबत निवेदनाद्वारे विनंती केली होती. त्याला त्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्याचबरोबर कॅ. फैरोज मुकादम, मुनीर कर्लेकर, मोहम्मद सहर कर्लेकर यांनीही यासाठी विशेष प्रयत्न केले होते.

सुटकेनंतर दोन्ही रत्नागिरीकर भारतात येण्यास रवाना

शुक्रवारी 11 एप्रिल रोजी सर्व सात भारतीय खलाशांची समुद्री चाच्यांच्या तावडीतून सुटका करण्यात आली. सुटकेनंतर समीन मिरकर आणि रेहान सोलकर यांच्या कुटुंबीयांनी आणि रत्नागिरीकरांनी आनंद व्यक्त केला आहे. सुटका झालेले समीन आणि रेहान हे दोन्ही तरुण शनिवारी, 12 एप्रिल रोजी आफ्रिकेतून भारताकडे परतण्यासाठी निघाले असून, ते लवकरच आपल्या घरी रत्नागिरीत परततील, अशी अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT