रत्नागिरी : शहरातील ओझरवाडी येथील शंकर मंदिरासमोर राखणेच्या मानाच्या ताटावरून झालेल्या वादातून मारहाण झालेल्या ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते यशवंत कृष्णा फके (वय ७३) यांचा १५ मे रोजी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे ओझरवाडीसह शहर परिसरात खळबळ उडाली आहे.
२९ एप्रिल रोजी दुपारी ओझरवाडी येथे झालेल्या वादातून चौघांकडून फके यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत त्यांच्या पाठीवर, कमरेवर गंभीर दुखापत झाली होती. उजव्या खुब्याला मार लागून फ्रॅक्चर झाले होते. त्यांच्यावर चिपळूणमधील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. उपचारानंतर ते ओझरवाडी येथील घरी विश्रांती घेत होते. शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने अपरांत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर कामथे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, कार्यकर्ते व नागरिकांनी कामथे रुग्णालयात गर्दी केली होती. सुरुवातीला मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देण्यात आला होता. मात्र, नंतर वातावरण शांत झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी रामतीर्थ स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते
फके हे काँग्रेसचे निष्ठावान व ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून परिचित होते. चिपळूण शहर व तालुक्यात त्यांनी अनेक वर्षे सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदवला होता. नगर परिषदेच्या निवडणुकाही त्यांनी अनेकदा लढवल्या होत्या.