चिपळूण : धुळे येथील मूळ रहिवासी असलेल्या मात्र चिपळूण शहरातील पाग येथे राहाणार्या नवदाम्पत्याने गांधारेश्वर पुलावरून वाशिष्ठी नदीत उडी घेतल्यानंतर चोवीस तास उलटून गेले तरी अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही; मात्र हा प्रकार पती-पत्नीच्या भांडणातून विकोपाला गेला असल्याचे पुढे येत आहे. रागाच्या भरात पत्नीने वाशिष्ठी नदीत उडी घेतली. त्यानंतर पतीनेही त्याच मानसिकतेतून वाशिष्ठी नदीत उडी घेतल्याची दाट शक्यता आहे. त्या दृष्टीने पोलिस यंत्रणा, एनडीआरएफ व वाशिष्ठी नदीकाठावरील सर्व गावांच्या पोलिस पाटलांना सतर्क करण्यात आले असून दिवसभर या नवदाम्पत्याचा अधिकार्यांकडून शोध सुरू होता; मात्र सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचा पत्ता लागलेला नाही.
निलेश रामदास अहिरे व अश्विनी निलेश अहिरे या दोघांचे 9 मे रोजी लग्न झाले होते. दोन महिन्यातच ही घटना घडल्याने त्यांचा संसार फुलण्याआधीच कोमेजला अशा भावना व्यक्त होत आहेत. बुधवारी सकाळी 10ः30 वाजण्याच्या सुमारास गांधारेश्वर पुलावरून एका तरूणीने वाशिष्ठी नदीत उडी घेतल्याचे काहींनी पाहिले. यानंतर पुढील प्रकार घडला. त्याआधी या पती-पत्नीमध्ये घरामध्ये भांडण झाले होते. पती-पत्नीत भांडण झाल्याची माहिती मुलीने आपल्या आईला फोन करून सांगितली होती. पती कामाला गेल्यानंतर आईला फोनवरून या भांडणाची सर्व हकीकत मुलीने कळविली आणि फोन बंद करून ती घराबाहेर निघून गेली. त्याचवेळी मुलीच्या आईचा फोन जावई निलेश याला आला व तिने पत्नी घराबाहेर निघून गेल्याचे त्याला सांगितले. तो घाबरला आणि सर्वत्र शोधाशोध करू लागला. याचवेळी गांधारेश्वर पुलावरून कोणीतरी उडी मारल्याची बातमी शहरभर पसरली. याची माहिती मिळताच तो गांधारेश्वर पुलाजवळ गेला. यावेळी तेथे जमलेल्या लोकांकडून त्याला वाशिष्ठी नदीत कुणीतरी उडी मारल्याची माहिती मिळाली. त्याने त्या परिसरात शोधाशोध केली व पुलावर कोणी नसताना त्यानेदेखील आपल्या नातेवाईकाला फोन केला. आपल्या पत्नीने वाशिष्ठी नदीत उडी घेतल्याचे आपल्याला कळले आहे. आता मी तरी कशाला जगू? असे त्याने नातवाईकाला फोनवरून कळविले आणि त्यानंतर त्याचा फोन स्वीच ऑफ झाला.
यावेळी पोलिसांना त्याची मोटारसायकल गांधारेश्वर पुलावर सापडली. मात्र, फोन कायम स्वीच ऑफच येत होता. यावरून त्यानेदेखील याच वाशिष्ठीच्या पाण्यात उडी घेतल्याचा दाट संशय पोलिस व्यक्त करीत आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे व एनडीआरएफची टीम दिवसभर तपासात मग्न होती.