खेड : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गालगत तसेच जगबुडी नदीपात्राच्या जवळ भंगाराचे मोठमोठे ढिगारे साचले असून, भरणे नाका परिसरातील या प्रकारामुळे पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नदीपात्रालगत भंगार साठवणूक होत असतानाही संबंधित प्रशासनाकडून याकडे डोळेझाक केली जात असल्याचा आरोप होत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून भरणे नाका परिसराचा आढावा घेतला असता जगबुडी नदीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर भंगार साठविल्याचे चित्र दिसून येते. विविध प्रकारचे टाकाऊ साहित्य आणि भंगाराचा साठा नदीपात्राच्या जवळ असल्याने पावसाळ्यात त्यातील कचरा नदीत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगबुडी नदीच्या प्रदूषणाचा धोका वाढला असून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही ही बाब गंभीर मानली जात आहे.
विशेष म्हणजे, याच परिसरातील ब्रिटिशकालीन जुना पूल धोकादायक स्थितीत असल्याचे सांगितले जात असताना या पुलाचा व्यावसायिक वापर होत असल्याचेही निदर्शनास येत आहे. या पुलावरून भंगाराची वाहतूक होत असल्यास भविष्यात दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुलाची सुरक्षितता आणि त्याचा व्यावसायिक वापर याबाबत प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. नदीपात्र, राष्ट्रीय महामार्ग व धोकादायक पूल अशा तीनही दृष्टीने संवेदनशील असलेल्या परिसरात भंगाराचे डोंगर उभे राहत असताना महसूल, पोलिस, सार्व. बांधकाम तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्यांचे लक्ष याकडे का जात नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.