रत्नागिरी : जिल्हा विशेष कारागृहाच्या मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. pudhari photo
रत्नागिरी

Ratnagiri News : स्वा. सावरकरांच्या कारागृहाचे रुपडे पालटणार!

Veer Savarkar jail : कोठडी, छायाचित्र दालनाचेही नूतनीकरण होणार; इमारतीचे मजबुतीकरण होणार

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : रत्नागिरी विशेष कारागृह हे स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहे. स्वा. सावरकर यांना याच कारागृहामध्ये कैदेत ठेवण्यात आले होते. अशा या ऐतिहासिक कारागृहाच्या इमारतीचे मजबुतीकरण आणि नूतनीकरण सुरू करण्यात आले आहे. सुमारे पावणेसहा कोटींचा निधी खर्च करून कारागृहाचे मजबुतीकरण केले जात आहे.

मुख्य इमारतीच्या दर्शनी भागाचे सुशोभीकरण केले जात आहे. त्यामध्ये स्ट्रक्चर स्टील वर्क करणे, छपराची कौले काढून त्या ठिकाणी प्रिकोटेड शीट बसविणे, इमारतीच्या आवश्यक ठिकाणो जुने प्लास्टर काढून नवीन प्लास्टर केले जाणार आहे.

कारागृहातील बंदीवान असलेल्या पुरूष आणि महिला कारागृह, अंडा सेल, स्वयंपाकगृह, गोदाम, मनोरंजन-कक्ष, दवाखाना, देखरेख टॉवर, जुने दरवाजे व खिडक्या काढून त्या ठिकाणी नवीन बसविणे अशीही कामे केली जाणार आहेत. या कारागृहाचे जुने छत काढून आता नव्याने प्री-कोटेड शीट बसविल्या जाणार आहेत तर फोम सिलींग, आतील व बाहेरील रंगकाम, जलप्रतिबंधक उपाययोजना केल्या जाणार आहेत.

त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना ठेवण्यात आलेल्या कोठडीतील छायाचित्र दालनाचे नुतनीकरण केले जाणार आहे. तसेच कोठडीची डागडुजी, सिलींगचे काम केले जाणार आहे. कारागृह कार्यालयातील कारागृह अधीक्षक कार्यालयाचे नूतनीकरण, विविध शाखांचे नूतनीकरण आदी कामे नव्याने केली जाणार आहेत. या विशेष कारागृहाच्या दर्शनी भागाकडील मुख्य इमारतीचे छत तसेच समोरील भिंतीचे काम सध्याच्या स्थितीत प्रगती पथावर आहे. त्याबरोबर आतील व बाहेरील जुने प्लास्टर काढून नवीन प्लास्टरची कामेही सुरु आहेत.

5 कोटी 52 लाखांचा निधी...

मंत्रिमंडळाने राज्यातील विविध कारागृहांमध्ये बांधकामांसाठी 53.1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये रत्नागिरीच्या विशेष कारागृहाचाही समावेश होता. रत्नागिरी येथील विशेष कारागृहात आवश्यक बांधकामासाठीही या निधीचा विनियोग होणार आहे. त्यानुसार या कामीं सुमारे 5 कोटी 52 लाख 73 हजारांची निविदा काढण्यात आली होती. त्यानुसार रत्नागिरी विशेष कारागृहाच्या नूतनीकरण आणि मजबुतीकरणाला प्रारंभ झालेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT