राजापूर : शरद पळसुले-देसाई
सौंदळ रेल्वेस्थानक (हॉल्ट) कायमस्वरुपी स्थानकाच्या प्रतीक्षेत आहे. यापूर्वी कोकण रेल्वे प्रशासनाने सौंदळ येथील हॉल्टचे रुपांतर क्रॉसिंगमध्ये करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्याला बराच काळ लोटला, पण सौंदळ येथे क्रॉसिंग स्थानकाबाबत काहीच हालचाल दिसत नसल्याने संबंधीत कोरे प्रशासनाने दिलेल्या शब्दानुसार कार्यवाही करावी, अशी मागणी आता तालुकावासीयांमधून करण्यात येत आहे.
दरम्यान, सौंदळ येथे कायमस्वरूपी रेल्वेस्थानक व्हावे, अशी जोरदार मागणी पुन्हा एकदा सुरु झाली असून, नव्या वर्षात सौन्दळ स्थानकाचा प्रश्न मार्गी लागावा, अशी अपेक्षा पूर्व परिसरामधून व्यक्त होत आहे. सौंदळ स्थानकाचे क्रॉसिंग स्थानकात रुपांतर करण्याचे लेखी अश्वासन कोकण रेल्वे प्रशासनाने यापूर्वी दिले होते.
कोकण रेल्वे मार्गावर बहुतांशी राजापूर तालुक्याला सोयीचे ठरेल अशा सौंदळ येथे थांबा मिळावा, अशी सातत्याने मागणी तालुक्याच्या पूर्व परिसरातून अनेक वर्षे होत होती. तालुक्यातील येळवण गावचे सुपुत्र, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य असे प्रा. चंदुभाई देशपांडे यांनी सातत्याने सौंदळ स्थानकासाठी संघटितपणे रेटा लावून धरला होता. तालुकावासीयांच्या सुदैवाने कोकणचे सुपुत्र व तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सौंदळ हॉल्टला मान्यता दिली होती आणि वर्षभरातच सौंदळ हॉल्टचे काम मार्गी लागून त्याचे उद्घाटन ना. प्रभूच्या हस्ते पार पडले होते आणि सौंदळमध्ये पहिली पॅसेंजर दिवा सावंतवाडी थांबली.
समस्त तालुकावसीयांच्या इच्छा पूर्ण झाल्या होत्या. राजापूर रोड स्थानकानंतर तालुक्यात थांबा मिळालेल्या सौंदळ दुसरे स्थानक (हॉल्ट) ठरले आहे. सौंदळ स्थानकातील विद्यमान स्थिती सौंदळ येथे हॉल्ट स्थानक (थांबा) आहे. सकाळी सावंतवाडीकडून दिव्याकडे जाणारी आणि सायंकाळी दिव्याहून आलेली आणि सावंतवाडीकडे जाणारी गाडी थांबते. ही गाडी मेन लाईनवरच जवळपास मिनिटभर थांबते.
येथे प्लॅटफॉम नसल्याने थांबणाऱ्या गाडीतून उतरणे किंवा गाडीत चढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. गर्दीच्या वेळी तर खूप गडबड उडते. त्यामुळे प्रवाशांना त्रास होतो. विशेषतः लहान मुले, वृद्ध नागरिक यांना येथे चढ-उतार करणे अवघड आहे. त्यामुळे पूर्व परिसरातील असे सौंदळ से SAUNDA प्रवासी लगत असलेल्या विलवडे स्थानकातून प्रवास करणे पसंत करतात. सौन्दळमधील प्रवासी महसुली उत्पन्न कमी होण्यामागे हेदेखील एक कारण ठरले आहे. सौंदळबाबत असलेल्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून तेथे कायमस्वरूपी स्थानक व्हावे, अशी मागणी मागील काही वर्षे सातत्याने सुरु असून, कोकण रेल्वे प्रशासनाने त्याकडे लक्ष देणे अत्यावश्यक बनले आहे.
आश्वासन पूर्तीची प्रतीक्षा
त्यानंतर बराच कालावधी लोटला, पण सौंदळचे क्रॉसिंग स्थानकात रुपांतर करण्यात आलेले नाही. संबंधित कोरे प्रशासनाने कोणता निर्णय घेतला तेदेखील पुढे आलेले नाही. मात्र, कोरे प्रशासनाने सौंदळसंदर्भात दिलेला शब्द पाळावा व पूर्ण करावा, अशी जोरदार मागणी आता तालुक्यातुन बाहूलागली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासन त्याबाबत कोणती भूमिका घेते ते पहाणे महत्वाचे ठरणार आहे. यासंदर्भात खा. नारायणराव राणे यांना निवेदन सादर करून त्यांचेही लक्ष वेधण्यात आले आहे.
हॉल्ट स्थानक मापदंडानुसारच
कोकण रेल्वे सौंदळ स्थानक हे हॉल्ट स्थानक असून, मापदंडानुसार या स्थानकावर प्रवासी सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. तसेच सध्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता गाड्यांना दिलेले थांबे पुरेसे आहेत. निरनिराळ्या सेवा सुविधांमध्ये वाढ करणे ही एक नियमित प्रकिया आहे आणि गरजा तसेच स्टेशन प्राधान्य वानुसार टप्प्याटप्प्याने त्यात वाढ केली जाते. त्यामुळे निधी उपलब्धतेनुसार क्रॉसिंग स्थानकासाठीच्या आवश्यक गोष्टींची पूर्तता करून सौंदळचे हॉल्ट स्थानकातून कॉसिंग स्थानकामध्ये रूपांतरण करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते.