सांगली : सांगली-मिरज रस्त्यालगत ‘हॉटेल झटका’समोरील अनधिकृत बांधकाम महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने तोडले. महापालिकेच्या विकास योजनेतील रस्त्यावर (डीपी रोड) दीर्घकाळपासून असलेले अतिक्रमण हटवल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी आयुक्तसत्यम गांधी यांचा सत्कार केला.
शहरातील वाहतूक आणि नियोजित विकास मार्गात अडथळा निर्माण करणार्या अतिक्रमणांवर महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई केली. क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 2 अंतर्गत येणार्या प्रभाग क्रमांक 19 मधील सांगली-मिरज रोड लगत असलेल्या हॉटेल झटका या ठिकाणी झालेले अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. याठिकाणी डी.पी. रोड मंजूर असतानाही, नाल्यावर अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. ते दीर्घकाळपासून प्रलंबित होते. ते तोडण्यात आले. आयुक्त सत्यम गांधी यांच्या थेट आदेशानुसार उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली. सहायक आयुक्त नागार्जुन मद्रासी यांच्या नेतृत्वाखालील अतिक्रमण विभागाने ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली. या महत्त्वाच्या ठिकाणी अनेक दिवसांपासून अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण हटवल्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांनी आयुक्त सत्यम गांधी आणि सहायक आयुक्त नागार्जुन मद्रासी यांचा सत्कार केला.