देवरुख : संगमेश्वर तालुका पंचायत समितीवर 64 वर्षांमध्ये 36 सभापती बसले आहेत. यामध्ये 10 महिलांना सभापती होण्याचा मान मिळाला आहे. आता 37 व्या सभापतीची प्रतीक्षा लागली आहे. सर्वसाधारण महिला आरक्षण असल्याने या खुर्चीचा मान कोण मिळवतो हे लवकर स्पष्ट होणार आहे. पंचायत समितीची 1 मे 1962 रोजी स्थापना करण्यात आली. यावेळी म. वि. पवार यांना पहिला सभापती होण्याचा मान मिळाला. यानंतर मु. अ. मोडक, सि. धो. सावंत, ना. का. शेटये यांनी 30 एप्रिल 1981 पर्यंत कामकाज सांभाळले.
1 मे 1981 पासून सलग अकरा वर्षे 13 मार्च 1992 पर्यंत पंचायत समितीचा प्रशासकीय कारभार चालला. 14 मार्च 1992 रोजी सुभाष बने यांनी सभापती पदाची सूत्रे हाती घेतली. ती सलग पाच वर्षे 1997 पर्यंत या पदाला त्यांनी न्याय दिला. यानंतर जयराम गो. रामाणे यांनी एक वर्ष हे पद सांभाळले. यानंतर झालेल्या निवडणुकीनंतर पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला सभापती म्हणून शालिनी बा. गोवळकर यांना संधी मिळाली. त्यांनीही एक वर्ष या पदावर काम केले. विजय गो. कदम, संतोष मारुती लाड, स्मिता संतोष लाड, या पती पत्नीला सलग पंचायत समिती सभापतीपदी दोन वेळा ही संधी मिळाली.
कृष्णा गु. हरेकर, दिगंबर स. देसाई, सुभाष बा. नलावडे, नारायण रावजी भुरवणे, मधुकर सोमा गुरव, दिलीप कृष्णा पेंढारी, राजेश रमाकांत मुकादम, नंदादीप नंदकुमार बोरुकर, नम्रता नितीन कवळकर, सुजित विष्णू महाडिक, दीप्ती दीपक सावंत, मनीषा मुकुंद गुरव, संतोष रामचंद्र डावल यांनी 18 जानेवारी 2016 पर्यंत सभापतीपद भूषवले. यानंतर डॉ. हर्षदा हेमंत डिंगणकर, सारिका किरण जाधव, दिलीप श्रीराम सावंत, सोनाली रामचंद्र निकम, सुजित विष्णू महाडिक, प्रेरणा प्रदीप कानाल यांनी 15 मार्च 2021 पर्यंत कार्यभार सांभाळला. यानंतर जयसिंग लक्ष्मण माने यांनी पंचायत समितीचे विसर्जन होईपर्यंत म्हणजेच 2023 पर्यंत सभापती पद भूषवले.
सभापतीपदावर 1992 पासून सलग 2023 पर्यंत शिवसेनेचाच भगवा पंचायत समितीवर फडकवून या पदावर सेनेच्या मावळ्यांनाच संधी मिळाली आहे. सध्या पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे. सभापती पदे सर्वसाधारण महिला असे आरक्षित झाले असल्याने निवडून येणाऱ्या महिलांमधून एका महिलेला ही संधी मिळणार आहे.