Sangameshwar-Devrukh highway
संगमेश्वर : संगमेश्वर-देवरूख मार्गाबाजूला केलेले खोदकाम.  pudhari photo
रत्नागिरी

संगमेश्वर-देवरूख महामार्ग बनलाय धोकादायक

बेदरकारपणे रस्ते खोदकामाचा परिणाम

पुढारी वृत्तसेवा

देवरुख : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून संगमेश्वर-देवरुख मार्गे कोल्हापूरकडे जाणार्‍या राज्य मार्गाची पावसाळ्यात अत्यंत दुरवस्था झाली. या मार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडले. याबाबत वाहनचालक आणि प्रवाशांनी सातत्याने ओरड केल्यानंतर या मार्गाची काही प्रमाणात डागडूजी करण्यात आली. मात्र पावसाळा सरताच खासगी कंपन्यांनी इंटरनेटच्या केबल टाकण्यासाठी संगमेश्वर-देवरुख मार्गावर अनेक ठिकाणी बेदरकारपणे खोदकाम सुरू केले आहे. यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे.

या खोदाईत रस्त्यालगत असणारे गाईड स्टोन उखडून टाकण्यात आले असून ठिकठिकाणी रस्ता धोकादायक बनला आहे. देवरुख येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या सर्व बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल वाहनधारक तसेच स्थानिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

गेले काही दिवस संगमेश्वर-देवरुख मार्गावर अनेक ठिकाणी एका खासगी कंपनीकडून इंटरनेटची केबल टाकण्यासाठी खोदाई करण्याचे काम सुरू आहे. याबाबत राज्य मार्गावरील गावात असणार्‍या ग्रामपंचायतींना देखील विश्वासात घेतले गेलेले नाही. त्यांच्याकडून कोणतीही लेखी परवानगी घेतली नसल्याने काही ठिकाणी ग्रामपंचायतीच्या नळ पाणी योजनेचे पाईप फुटले आहेत. लोवले, बुरंबी, करंबेळे आदी गावातून केबल टाकण्यासाठी खोदलेले चर व्यवस्थित न बुजवल्याने येथील मार्ग धोकादायक बनले आहेत. मयुरबाग येथे खोदलेला डांबरी रस्ता खचू लागला आहे. यावर्षी लोवले एसटी बस थांबा येथे ओढ्याजवळ धोकादायक बनलेली भिंत नव्याने उभारण्यात आली. खासगी कंपनीने इंटरनेटची केबल टाकताना या संरक्षण भिंतीजवळ खोदकाम करून येथील रस्ता धोकादायक करून ठेवला आहे.

लेखी तक्रार करणार

याबाबत लोवले येथील ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी केबल टाकणार्‍या कंपनीच्या कर्मचार्‍यांना विचारले असता, त्यांनी अत्यंत बेजबाबदारपणे, आम्ही बांधकाम विभागाची परवानगी काढली आहे त्यामुळे आम्हाला अन्य कोणाच्याही परवानगीची गरज नाही, असे उत्तर दिले. खासगी कंपनीची केबल टाकण्यासाठी रस्त्याची वाताहात करण्याचे काम सुरू असल्याने याबाबत आपण जिल्हाधिकारी आणि बांधकाम विभागाच्या सचिवांकडे लेखी तक्रार करणार असल्याचे प्रवासी संघटनेचे परशुराम पवार यांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.