संग्रहित छायाचित्र file photo
रत्नागिरी

माखजन, करजुवे खाडीत वाळू चोरांचा धुडगूस

Sand theft: जनतेचे जीवन धोक्यात; बहुजन विकास आघाडीचे सुरेश भायजे यांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील माखजन, करजुवे खाडीत सध्या वाळूची बेकायदा लूट सुरू आहे. यापूर्वी या परिसरातील अल्प प्रमाणात वाळू चोरी होत होती. मात्र, आता चिपळूणसह कराड, कोल्हापूरचे वाळू माफिया या भागात उतरल्याने गेले चार दिवस दोनशे ते अडीचशे ट्रक, डंपरच्या सहाय्याने वाळू चोरट्यांनी माखजन विभागात अक्षरशः हैदोस घातला आहे. त्यामुळे येथील जनतेचे जीवन मात्र धोक्यात आले आहे, असा आरोप बहुजन विकास आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश भायजे यांनी केला आहे.

राजकीय पुढारी, भ्रष्ट प्रशासन यांच्या संगनमताने हा वाळू चोरी व्यवसाय राजरोसपणे चालू असल्याचे भायजे यांचे म्हणणे आहे. दिवसरात्र ओली वाळू वाहतूक डंपरद्वारे केल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी सांडत असल्याने रस्ता चिखलमय निसरडा बनत आहेे. त्या चिखलमय रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहेे. जरा ब्रेक केला तरी बाईक, रिक्षा घसरून अपघात होतात. यापूर्वी दोन बाईकस्वारांना आपला जीव गमवावा लागला आहे.

सकाळी 5.30 वाजता आरवली रेल्वे स्थानकात तुतारी एक्सप्रेस मधील प्रवासी व 6.30 ला मुंबईला जाणारे दिवा पॅसेंजर मधील प्रवाशांची यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने करजुवे ते माखजन ते आरवली असा प्रवास करणार्‍यांना निरपराध लोकांना अपघाताचा मोठा फटका बसत आहे.आरवली ते माखजन ते करजुवे या 20 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची साइडपट्टी उखडल्याने हे वाळू वाहतूक करणारे मग्रुर, अहंकारी डंपर चालक डांबरीकरणावरून खाली उतरत नाहीत, अनेक वेळा समोरच्या वाहन चालकाशी हुज्जत घालतात, वाद करतात. परिणामी, समोरच्या दुचाकी रिक्षा व चारचाकी वाहनाने गाडी रस्त्यावरुन खाली घेऊन कसरत करत चालवावी लागते. माखजन ते करजुवे गडनदी खाडीचेे पात्र अरुंद असल्याने संक्शन पंपाने वाळू काढून उर्वरित चाळ चे ढिग नदीपात्रात सोडले जात असल्याने विरुद्ध दिशेचा नदीकाठ पाण्याच्या प्रवाहाने तोडल्याने भातशेती जमीनच नष्ट होत आहे.

माखजन खाडी परिसरातील पारपरिक मासेमारी हे उत्पन्नाचे साधन होते.मात्र संक्शन पंपाद्वारे साठ- सत्तर फूट खोल खड्डा मारून वाळू काढली जात असल्याने मासेमारी साठी खाडीत उतरलेल्या करजुवे येथील बाचिम तर कासे गावातील जड्यार अशा दोघांचा खड्यात अडकून मृत्यू झाला होता.त्यामुळे या खाडीतील मासेमारी पूर्ण बंद झाली आहे.

संगमेश्वर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष डीवायएसपी शिवप्रसाद पारवे यांनी या बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर कारवाई करत तीन वाळूने भरलेले डंपर जप्त करून रीतसर वाळू चोरीचा, वाहतुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे दोन दिवस वाळू उत्खनन बंद होते.डिवायएसपी पारवे हे रजेवर गेल्यामुळे आता पुन्हा आठ दहा दिवस राजरोस वाळू उत्खनन सुरू झाले आहे.

नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ज्या तालुक्यात बेकायदेशीर वाळू उत्खनन चालू असेल त्या भ्रष्ट तहसीलदारावर निलंबनाची कारवाई केली जाईल, असे जाहीर करण्यात आले होते.मात्र रत्नागिरी जिल्ह्यात अनेक तालुक्यातून राजरोसपणे विना परवाना वाळू उत्खनन चालू आहे. मात्र शासनाच्या आदेशाप्रमाणे कोणत्याच तहसीलदारावर कारवाई झालेली नाही. या चोरट्या धंद्यांना लोकप्रतिनिधींचा वरदहस्त आहे. त्यांच्यावर कोण कारवाई करणार, असा सवाल सुरेश भायजे यांनी उपस्थित केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT