सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आलेली वाघीण. Pudhari Photo
रत्नागिरी

Tiger Conservation Sahyadri | दीड वर्षात सह्याद्रीत व्याघ्र बछड्यांची डरकाळी!

प्रकल्पात वाघांसाठी आणली मादी, वन विभागाच्या प्रयत्नांना यश येण्याची अपेक्षा

पुढारी वृत्तसेवा

समीर जाधव

चिपळूण : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये येत्या दोन-तीन वर्षांत सह्याद्री व्याघ्र दर्शन सुरू होईल. त्यासाठी वन विभाग सातत्याने प्रयत्नशिल आहे. या प्रकल्पामध्ये तीन वाघ असून आता ते वाघ मादी वाघिणीच्या शोधात भटकत आहेत. त्यातील ‘सेनापती’ आणि ‘सुभेदार’ हे दोन वाघ ‘चंदा’चा शोध घेत-घेत तिच्या जवळ येत आहेत. लवकरच त्यातील एका वाघाबरोबर ‘चंदा’चे मिलन होऊन वर्ष-दीड वर्षात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघाचे बछडे जन्म घेतील आणि पुढील तीन वर्षात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व्याघ्र दर्शनासाठी पर्यटकांना आकर्षित करील, असा विश्वास ‘मुशाफिर जंगलवाटांचे’ या कार्यक्रमात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व वनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी व्यक्त केला.

शहरातील विभागीय वन अधिकारी कार्यालय अंतर्गत सेमिनार हॉलमध्ये रविवारी सायंकाळी निलेश बापट निसर्ग कट्ट्यांतर्गत ही मुलाखत घेण्यात आली. यावेळी चव्हाण यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत अनेक रोमांचक गोष्टी उपस्थितांसमोर मांडल्या. वाईल्डलाईफ अनमिलिटेड, ग्लोबल चिपळूण व वन विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प 1165 चौ. कि.मी. क्षेत्रात व्यापलेला आहे. या भागात सुमारे 50 हून अधिक वाघ सहज राहू शकतात, इतके हे समृद्ध जंगल आहे. येथे वाघाचे प्रमुख भक्ष्य असणारे गवा आणि सांबर मोठ्या प्रमाणात आहेत.

या शिवाय सह्याद्रीच्या वेगवेगळ्या भागात पाणवठे देखील आहेत. ब्रिटीश काळापूर्वी या सह्याद्री पट्ट्यात अनेक वाघ होते. त्या काळात 36 वाघांच्या शिकारीची परवानगी देखील होती. याच्या नोंदीदेखील आढळतात. शिकारीमुळे मधल्या काळात वाघांची संख्या घटली. मात्र, गेल्या काही वर्षात शिकारीचे प्रमाण कमी झाल्याने आता सह्याद्रीमध्ये तीन वाघ असल्याचे समोर आले आहे. यात नर तीन वाघांमध्ये एकही मादी वाघ नाही.

त्यामुळे हे वाघ वाघिणींच्या शोधात पूर्ण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये भटकत आहेत. वाघांची संख्या वाढविण्यासाठी इतर भागातून वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणण्याचे काम वन विभागाने सुरू केले आणि तारा ऑपरेशन अंतर्गत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ताडोबामधून ‘चंदा’ ही वाघीण आली. आता ती या ठिकाणी स्थिरावत असून तिने पहिली शिकार देखील केली आहे. व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणार्‍या परिसरातील लोकांची सुरक्षा, त्यांचे प्रशिक्षण, मार्गदर्शन यासाठी वन विभाग प्रयत्न करीत आहे.

वाघीण सह्याद्रीत आणण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले. तिला बेशुद्ध करून रेडिओ कॉलर लावण्यात आली. आता तिच्या सह्याद्रीच्या परिसरात कुठे वावर सुरू आहे हे प्रत्येक अर्ध्या तासाने आपल्याला कळते आणि अचूक माहिती मिळते. मात्र, सह्याद्रीत असणार्‍या तीन वाघांना अशाप्रकारे रेडीओ कॉलर लावलेला नाही. त्यामुळे त्यांचे केवळ फोटोग्राफी व कॅमेर्‍याच्या माध्यमातून अवलोकन करून त्यांचा वावर कुठे असल्याचे स्पष्ट होते.

सध्या सह्याद्रीमध्ये तीन वाघ आहेत. त्यात आता या वाघिणीची भर पडली आहे. सह्याद्री प्रकल्पात सेनापती (टी-1), सुभेदार (टी-2) आणि बाजी (टी-3) हे तीन वाघ आहेत. सद्यस्थितीत यातील दोन वाघ चंदा वाघिणीच्या दिशेने येऊ लागले आहेत. चंदा ही वाघीण तीन वाघांपैकी मिलनासाठी कोणत्या वाघाची निवड करू शकते याचे स्वातंत्र्य तिला आहे. सद्यस्थितीत चंदापासून ‘सेनापती’ हा वाघ अवघ्या 9 कि.मी. अंतरावर तर ‘सुभेदार’ हा 25 कि.मी. अंतरावर आहे. सध्या ‘चंदा’ ही चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे.

निसर्गप्रेमी व युवकांना मोठी संधी...

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या निमित्ताने निसर्गप्रेमी व युवकांना मोठी संधी आहे. लवकरच वन विभाग कुशल असे गाईडतयार करणार आहे. गिर्यारोहण, पर्यटनासाठी मार्गदर्शक ठरणारे गाईडसाठी प्रशिक्षण दिले जाईल. त्याच पद्धतीने फोटोग्राफी, वाईल्ड फोटोग्राफी, वन विभागंतर्गत विविध स्पर्धा परीक्षा, सामाजिक संस्था अशा विविध माध्यमातून युवकांना संधी उपलब्ध होईल. वन विभागात देखील यातून संधी मिळेल. त्यामुळे युवकांनी निसर्ग संरक्षणासाठी पुढे यायला हवे अशा अपेक्षा व्यक्त केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT