पावस : अवकाळीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने पावस परिसरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात भात शेतीचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे सुरू आहेत. यामध्ये सुमारे 25 ते 30 टक्के भाग शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र गेले दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे अनेकठिकाणी जमीनदोस्त झालेली भातशेती जमा करण्यास शेतकर्यांनी सुरुवात केली असून काही शेतकर्यांची भात कापणी पूर्णत्वास गेल्याने व पावसाने विश्रांती घेतल्याने नाचणी पीक वेचण्यास शेतकरी मग्न झाले आहेत.
सुरुवातीला पावसाच्या विश्रांतीच्या दरम्यान सुमारे75 टक्के शेतकर्यांनी भात कापणी केली होती, परंतु पावसाने धुमाकूळ घातल्याने उर्वरित भात शेती पावसामध्ये भिजल्यामुळे व काहीठिकाणी भात शेती आडवी झाल्यामुळे शेतकर्यांची दयनीय अवस्था झाली होती. काही ठिकाणी सततच्या पावसामुळे भात रुजून आले होते. अशा स्थितीमध्ये शासन निर्णयानुसार शेतकर्यांना आर्थिक मदत मिळावी या दृष्टिकोनातून सर्व गावांमध्ये कृषी विभागातर्फे पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आली होती. याचदरम्यान अनेकठिकाणी नाचणी पीक आडवे झाले होते, परंतु पावसाने काहीप्रमाणात विश्रांती घेतल्यामुळे शेतकर्यांनी नाचणी पीक चांगले तयार झाल्याने त्याची कणसे वेचण्यास जोरदार सुरुवात केली आहे.
यासंदर्भात शेतकरीश्री अर्जुन भूते म्हणाले की, यावर्षी सुरुवातीपासून भात शेती व नाचणी पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले होते, परंतु पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे भात शेतीला त्रासदायक ठरले. पावसाच्या लपंडावामध्ये काही प्रमाणात भात शेतीची कापणी करण्यात आली. आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तयार झालेले नाचणी पीक काढण्यास सुरुवात केली आहे.