Pavitra Portal Teacher Recruitment Pudhari
रत्नागिरी

Ratnagiri News : टीईटी घोटाळ्यातील ‘त्‍या’ ७ संशयितांना लवकरच नियुक्‍ती

उर्वरित सहाजणांना अद्याप ब्रेकच - प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीषा जगदाळे यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरी : पहिल्‍या टप्‍प्‍यात पवित्र पोर्टलमधून रत्‍नागिरी जिल्‍हा परिषदेला ४५७ नवे शिक्षक मिळाले आहेत. त्‍यापैकी १३ संशयित उमेदवारांची नावे टीईटी घोटाळ्यात असल्‍यामुळे त्‍यांना नियुक्‍ती देण्यात आली नव्‍हती. मात्र, आता यापैकी ७ उमेदवारांची नावे टीईटी घोटाळ्यात नसल्‍यामुळे त्‍यांच्‍याकडून नोटरी पध्दतीने लिहून नियुक्‍ती देण्यात येणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीषा जगदाळे यांनी सोमवारी दिली.

जिल्‍ह्यात १ हजार १७ शिक्षकांची पदे रिक्‍त असून पहिल्‍या टप्‍प्‍यात ४७८ पैकी कागदपत्रे तपासून ४५७ शिक्षकांची भरती नुकतीच झाली. त्‍यापैकी १३ संशयित उमेदवारांची नावे २०२०-२१, २०२२ च्‍या टीईटी घोटाळ्यात असल्‍यामुळे त्‍यांना नियुक्‍ती देण्यात आली नव्‍हती. आता जिल्‍हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्‍या वतीने त्‍या १३ पैकी ७ उमेदवारांची नावे घोटाळ्यात नसल्‍यामुळे त्‍यांना नियुक्‍ती देण्‍यात येणार आहे. मात्र, त्‍यांच्‍याकडून नोटरी पध्दतीने लिहून घेण्यात येणार आहे की, टीईटी घोटाळ्यात माझे नाव नसून मला नियुक्‍ती पत्र द्यावे, जर माहिती खोटी निघाल्‍यास अपात्रतेची कारवाई करावी, असे लिहून घेऊन नियुक्‍ती देण्यात येणार आहे.

उर्वरित सहा उमेदवारांना अद्याप नियुक्‍ती दिली जाणार नाही. पुणे येथील सायबर क्राईम विभागाच्‍या वतीने कागदपत्रांची तपासणी आणि त्‍यांचे प्रमाणपत्र आल्‍यानंतर त्‍या सहा उमेदवारांना नियुक्‍ती द्यायची का नाही ते ठरवले जाईल, असेही जगदाळे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT