Ratnagiri Zilla Parishad 
रत्नागिरी

Ratnagiri News| जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करा

जि. प. स्थायी समिती बैठकीत ठराव; प्रशासन अलर्ट मोडवर, अडीच हजार हेक्टरवरील पंचनामे पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील केवळ तीन तालुक्यांपुरता दुष्काळ मर्यादित न ठेवता नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावेत, असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी मंजूर करण्यात आला. उर्वरित सहा तालुक्यांतील पिकांची स्थितीही बिकट असल्याने त्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. सध्या रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर या तीन तालुक्यांत शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, कमी पावसामुळे अन्य सहा तालुक्यांतील शेतीवरही गंभीर परिणाम झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नऊ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी ठरावाद्वारे करण्यात आली. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांत पिकांचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत अडीच हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. पंचनाम्याच्या प्रक्रियेत एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांनीही पंचनाम्याच्या कामात प्रशासनाला आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्षा केंद्रे यांनी केले.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले असून संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन आतापासूनच उपाययोजनांचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाणीसाठा वाढविण्यासाठी वनराई बंधारे उभारण्यावर भर देण्याबरोबरच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले.

बैठकीस अध्यक्षा अस्मिता केंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपाध्यक्ष विलास चाळके, अर्थ व शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, समाजकल्याण सभापती ॲड. सुयोग कांबळे, कृषी सभापती महेश नाटेकर यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT