रत्नागिरी : ग्रामीण भागातील कारभार हाकणाऱ्या जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्ह्यात सरासरी 60 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या. जि.प.साठी 151, तर पंचायत समितीसाठी 321 अशा 472 उमेदवारांचे राजकीय भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांत बंद झाले. सोमवारी (दि. 9) मतमोजणी होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या 56, तर पंचायत समित्यांच्या 112 जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत झाली. जिल्ह्यात काही ठिकाणी राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेमध्ये मैत्रीपूर्ण लढतीही झाल्या. ‘मिनी मंत्रालय’ असे संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेवर वर्चस्व स्थापन करण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली. शनिवारी सायंकाळी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन प्रत्येक तालुक्यातील स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आली असून सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मागील पंधरा दिवसांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा धुरळा उडाला होता. जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यामध्ये थेट लढत आहे. काही ठिकाणी भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना मैत्रिपूर्ण लढतीमुळे तिरंगी व चौरंगी लढतीही झाल्या.
जिल्हा परिषदेच्या 56 आणि नऊ पंचायत समित्यांमधील 112 जागांसाठी शनिवारी सकाळी साडेसात वाजल्या पासून मतदान प्रक्रिया सुरू झाली.या सत्रात मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली. प्रशासनाने देखील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. शनिवारी सकाळी साडेसात ते साडेनऊ या पहिल्या दोन तासात जिल्ह्यात 1 लाख 31 हजार 916 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या दोन तासांमध्ये 11.24 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. यात 76 हजार 221 पुरुष मतदारांनी तर 55 हजार 684 स्त्री मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सकाळी साडेसात ते 11.30 या कालावधीत जिल्ह्यात 26.48 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. एकुण 11 लाख 73 हजार 902 मतदारांपैकी 11.30 वाजेपर्यंत 3 लाख 10 हजार 804 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 1 लाख 60 हजार 276 पुरुष तर 1 लाख 50 हजार 527 स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी 1.30 वाजेपर्यंत जिल्ह्यात 39.52 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 63 हजार 904 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 2 लाख 26 हजार 150 पुरुष आणि 2 लाख 37 हजार 753 स्त्री मतदारानी मतदानाचा हक्क बजावला.
दुपारनंतर मतदानाचा टक्का काही प्रमाणात घसरला. दुपारी 1.30 ते 3.30 या दोन तासात केवळ केवळ 7.86 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सायंकाळी साडेतीन वाजेपर्यंत एकूण 5 लाख 56 हजार 159 मतदारांनी मतदान केले. यामध्ये 2 लाख 69 हजार 826 पुरुष तर 2 लाख 86 हजार 332 स्त्री मतदारांनी मतदान केल्याची नोंद करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत जिल्ह्यात सुमारे 60 टक्के मतदान झाले आहे. अनेक ठिकाणी ग्रामीण भागातून उशिरापर्यंत ईव्हीएम मशिन दाखल होत आहेत.
जिल्ह्यात सर्वाधिक गोंधळ चिपळूण तालुक्यात पहायला मिळाला. याठिकाणी तब्बल पन्नासहून अधिक मतदान यंत्र बंद पडली. त्यामुळे अनेक उमेदवार हवालदिल झाले असून, अनेकांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. अनेक ठिकाणी तीन-चार वेळा दुरुस्ती करुनही यंत्रणा बंद पडत होती. त्यामुळे चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
व्हीव्हीपॅट नसल्याने मतदाराचा आक्षेप
ईव्हीएमला व्हीव्हीपॅट म्हणजेच पेपर ट्रेल जोडण्यात आले नसल्याने मतदानाचा हक्क बजावताना प्रवीण कोळापटे यांनी आक्षेप घेतला. त्यांनी काही काळ मतदान केंद्रावरील मतदान थांबविले. व्हीव्हीपॅट का जोडण्यात आले नाही? असा निवडणूक यंत्रणेला जाब विचारला. राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करून अवमान केल्याचा आरोप कोळापटे यांनी केला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी आपण मतदान रोखू नका, असे सांगितले. त्यानंतर कोळापटे यांनी आपला लेखी अर्ज निवडणूक यंत्रणेकडे सादर केला.