रत्नागिरी जिल्हा परिषद नवीन प्रशासकीय इमारत 
रत्नागिरी

Ratnagiri News : जिल्हा परिषद नवीन इमारतीच्या खर्चात तब्‍बल १९ कोटींची वाढ!

७७.६६ कोटींच्या सुधारित अंदाजपत्रकाला मंजुरी; आधुनिक सुविधांसह फर्निचरचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या विस्तारीकरणासाठी आणि बांधकामाला अधिक गती देण्यासाठी सुधारित अंदाजपत्रकाला राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने मान्यता दिली आहे. मूळ ५८ कोटी ५७ लाख रुपयांच्या मंजूर निधीमध्ये सुमारे १९ कोटी ९ लाख रुपयांची वाढ करण्यात आली असून, आता इमारतीचा सुधारित खर्च ७७ कोटी ६६ लाख ९३ हजार रुपयांवर पोहोचला आहे. यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय नुकताच जाहीर केला आहे.

जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी २८ डिसेंबर २०२१ रोजी ५८ कोटी ५७ लाख १७ हजार रुपयांच्या कामाला मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर आधुनिक गरजांनुसार अनेक बाबींमध्ये बदल करण्याची आवश्यकता निर्माण झाली. सुरुवातीला मऊ व कठीण मुरमातील खोदकाम प्रस्तावित होते; परंतु प्रत्यक्ष कामादरम्यान जांभा दगडात खोदकाम करावे लागले. तसेच पायासाठी रिफिलिंग आणि अँटीटर्माइट अर्थात वाळवी प्रतिबंधक ट्रीटमेंटचे प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे.

आधुनिक सुविधांचा समावेश

इमारतीच्या सुधारित आराखड्यानुसार आकर्षक फर्निचर, अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण या कामांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय इमारतीत लिफ्ट बसविणे, सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक बळकटीकरण करणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आणि पर्यावरणपूरक सोलर पॅनेल यंत्रणा उभारणे अशा आधुनिक सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. या अतिरिक्त कामांमुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाली आहे.

मूळ मंजुरीपेक्षा खर्चात वाढ

मूळ अंदाजपत्रकाच्या तुलनेत सुधारित अंदाजपत्रकात सुमारे ३२.६९ टक्के वाढ झाली आहे. मूळ मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाच्या वेळी आलेल्या अडचणी आणि आधुनिक सुविधांची आवश्यकता लक्षात घेऊन हा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मूळ मंजुरीपेक्षा खर्चात १५ टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याने हा प्रस्ताव राज्य शासनाच्या व्यय अग्रक्रम समितीकडे पाठविण्यात आला होता. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर ग्रामविकास विभागाने सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाला गती मिळण्याची अपेक्षा असून, आधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज अशी प्रशासकीय इमारत उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आकडे बोलतात---

| एकूण प्रकल्‍प खर्च- ५८,५७,१३,३१४

| सुधारित मंजूर रक्कम ७७,६६,९७,४४०

| अतिरिक्‍त्त निधी- मूळ रक्‍कम- ९,९,८०,१२७

| सुधारित वाढ रक्‍कम- ३२.६१ टक्‍के

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT