रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्हा परिषदेला 4 वर्षांनंतर सदस्य मिळणार आहेत. शिवसेना-भाजप युती विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे पक्षामध्येच लढत झाली असली तरी जिल्हा परिषदेत परिणामकारक (कट्टर) विरोधी पक्ष असेल की नाही? याचे उत्तर सोमवारी संपूर्ण निकाल स्पष्ट झाल्यानंतर मिळणार आहे. या निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांच्या पाल्यांचे भवितव्य निश्चित होणार आहे. रत्नागिरीतील खालगाव, हातखंबा आणि गोळप जि. प. गटातील लढती स्फोटक आहेत.
शिवसेना-भाजप युतीचे यश समोर दिसत असले तरी हे यश रत्नागिरी नगरपरिषदेप्रमाणे प्रचंड असेल की शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार बाजी मारतील, याचा फैसलाही सोमवारीच होणार आहे. युतीतील भाजपला जागा कमी प्रमाणात मिळाल्या असल्याने भाजपचे अस्तित्व किती प्रमाणात असेल, याबाबतही उत्सुकता आहे.
जिल्हा परिषदेवर 4 वर्षांपूर्वी प्रशासक येण्याअगोदर एकत्रित शिवसेनेची सत्ता होती. एकूण 55 सदस्यांपैकी 39 शिवसेनेचे तर राष्ट्रवादीचे 15 आणि काँग्रेसचा 1 सदस्य होता. म्हणजेच त्यावेळची जिल्हा परिषद भाजप विरहित होती. शिवसेना विभागल्यानंतर जिल्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या मर्यादित नेतृत्व उरले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे पालकमंत्री उदय सामंत, गृह राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण ऊर्फ भैया सामंत यांचे एकहाती वर्चस्व असल्याचे नगरपरिषद, नगर पंचायतच्या निवडणुकीत सिद्ध झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचेच वर्चस्व राहणार आहे. संपूर्ण जिल्हयावर शिवसेनेची पकड असल्याने ही शिवसेनाच बाजी मारणार हे उघड आहे.
रत्नागिरी तालुक्यातील खालगाव, हातखंबा, गोळप गटाच्या निवडणुका स्फोटक आहेत. खालगाव जि. प गटातून तालुकाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप उमेदवार आहेत. हा त्यांचा नवीन गट आहे. हातखंबा जि.प गटातील उमेदवारीवरुन शिवसेनेत जे राजकारण ढवळले गेले असल्याने या दोन गटांची निवडणूक स्फोटक मानली जात आहे. शिवसेनेचे युवा नेते मुन्ना देसाई आणि त्यांच्या सहकार्यांनी परशुराम कदम यांना हातखंबा गटाची उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी हत्यार उपसले आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असणार्या परशुराम कदम यांना शिवसेनेत पुन्हा आणण्यासाठी मुन्ना देसाई आणि त्यांच्या सहकार्यांनी रात्रीचा दिवस करुन कदम यांना पालकमंत्री उदय सामंत यांच्या समोर मध्यरात्री उपस्थित केले. त्याच वेळी त्यांचा पक्षप्रवेश करुन घेण्यात आला. त्यावेळी हातखंबा जि.प गटातून परशुराम कदम यांना उमेदवारी मिळण्याची आशा होती. परंतू त्यांना शिवसेनेची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. मुन्ना देसाई यांनाही पदाचा राजीनामा देवून परशुराम कदम आणि खालगाव गटात शिवसेनेचे उमेदवार बाबु म्हाप यांच्याविरुद्ध प्रचार केला आहे. त्यामुळे या दोन्ही गटातील निवडणुक अटीतटीची मानली जात आहे.
हातखंबा गटातून परशुराम कदम यांना उमेदवारी न मिळण्यास तालुकाप्रमुखच कारणीभूत असल्याचा संशय असल्याने मुन्ना देसाई आणि त्यांच्या सहकार्यांनी हातखंबा बरोबरच खालगाव गटातील प्रचारात भाग घेतला. या दोन्ही गटातील निवडणुका फारच महत्वाच्या असल्याने शिवसेनेच्या नेत्यांना रात्रभर ठांण मांडून लक्ष ठेवावे लागले. गोळप गटात शिवसेनेचे नंदकुमार मुरकर उमेदवार असून त्यांच्या समोर एकत्रित शिवसेनेत असताना गुरु म्हणून मानले जाणारे उदय बने यांचे आवाहन आहे. त्यामुळे या गटातील निवडणुक गुरु विरुद्ध शिष्य अशीच असल्याने निकालही तसाच आर्श्चयकारक मानला जात आहे. सोमवारी मतमोजणी होणार असून संध्याकाळपर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांचे चित्र स्पष्ट होणार आहे.
बने- जाधव लढतीकडे लक्ष
शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार सुभाष बने यांचे सुपुत्र रोहन बने, आमदार भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव हे दोन्ही युवा नेत्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले आहे. हे दोन्ही युवानेते निवडणुक रिंगणात आहेत. त्यामळे या दोघांच्या गटातील लढतीकडे जिल्हयाचे लक्ष लागून राहीले आहे.