जिल्ह्यातील महिला, तरूणींनी केले हरितालिका व्रत  
रत्नागिरी

Ratnagiri : जिल्ह्यातील महिला, तरूणींनी केले हरितालिका व्रत

महिलांची पतीच्या दीर्घायुष्यासाठी, तरुणींची चांगला पती मिळण्यासाठी प्रार्थना

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेदिवशी मंगळवारी रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी व कुमारिकांनी चांगला वर मिळावा म्हणून हरितालिका व्रत केले. तसेच भगवान शंकर, पार्वती यांचे पूजन करून प्रार्थना केली.

पूर्वकाळात पार्वती हिने पर्वत राजा हिमालय याची कन्या शैलपुत्री म्हणून जन्म घेतला. लहान असताना तिने महादेवांशी विवाह करण्याची इच्छा वडिलांकडे बोलून दाखवली होती. जेव्हा ती उपवर झाली तेव्हा हिमलयाने नारदमुनींच्या सल्ल्याने तिचा विवाह भगवान विष्णूंसोबत करण्याचे ठरवले; परंतु पार्वतीने मनोमन महादेवांना पती म्हणून वरले होते. पण ती हे असे प्रत्यक्ष आपल्या पित्याला सांगण्याचे धाडस करू शकली नाही. अशावेळी तिने सखीकडून वडिलांना निरोप पाठवला, तुम्ही जर माझी लग्नगाठ विष्णूंशी बांधली तर मी प्राणत्याग करेन, इतक्यावरच न थांबता ती सखीच्या मदतीने घरातून पळून गेली व शिवप्राप्ती व्हावी म्हणून एका अरण्यात जावून शिवलिंगाची पूजा करण्यास आरंभ केला. या पूजेच्या दिवशी भाद्रपद मासातील तृतीया तिथी होती व हस्त नक्षत्र होते. पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली. दिवसभर कडक उपवास करून जागरण कले व तिच्या या कठोर तपाने शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देवून सहचारिणी म्हणून तिचा स्वीकार केला, अशी आख्यायिका आहे.

हरितालिका हे हिंदू धर्मातील महिला व कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी मंगळवारी रत्नागिरी शहर, जिल्ह्यातील महिलांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी तर कुमारिकांनी चांगला वर मिळावा यासाठी हरितालिकेचे व्रत केले. शहरातील बाजारपेठेत हरतालिका पूजनेसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी महिलांनी गर्दी केली होती. अशोक,आवळा, दुर्वांकूर, कण्हेरी, कदंब, ब्राम्ही, धोतरा, आघाडा, बेल व विविध प्रकारच्या पानासह विविध प्रकारची फुले खरेदी केली. महिलांनी पार्वती व तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तीसोबतच शिवलिंगाची पूजा केली. दिवसभर कडक उपवासानंतर महिला, कुमारिकांनी अन्नसेवन करून उपवास सोडला. अशा प्रकारे जिल्ह्यात हरतालिकेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT