रत्नागिरी : शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर राबणाऱ्या महिलांच्या कष्टांना आता शासकीय मान्यतेची मोहोर मिळू लागली आहे. महिला शेतकरी म्हणून स्वतंत्र ओळख आणि कृषी योजनांचा लाभ मिळवून देणाऱ्या शासनाच्या महिला शेतकरी सक्षमीकरण अभियानाला रत्नागिरी जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
जिल्ह्यातील तब्बल १ लाख १२५ महिलांनी या अभियानांतर्गत नोंदणीसाठी अर्ज केले असून त्यापैकी १२ हजार १३२ महिलांना अधिकृत प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे शेतीतील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासह शासकीय योजनांच्या लाभासाठी नवी दारे खुली होणार आहेत. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये या अभियानाची अंमलबजावणी सुरू असून आतापर्यंत १९६ ग्रामसभा घेण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी तालुका १८ हजार ८९१ अर्जांसह आघाडीवर आहे. त्या पाठोपाठ चिपळूणमध्ये १८ हजार ४४७, गुहागरमध्ये ११ हजार ३६७, खेडमध्ये ११ हजार २६३ महिलांनी नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. मंडणगड तालुक्यात ४ हजार ६२७ अर्जांची नोंद झाली आहे.
शेतीमध्ये महिलांचा मोठा सहभाग असूनही अनेकदा त्यांची स्वतंत्र शेतकरी म्हणून अधिकृत नोंद होत नाही. त्यामुळे कृषी योजनांचे अनुदान, आधुनिक शेती अवजारे, प्रशिक्षण आणि तांत्रिक मार्गदर्शनाच्या लाभापासून त्या वंचित राहतात. ही दरी भरून काढण्यासाठी महिला शेतकरी सक्षमीकरण अभियान महत्त्वाचे ठरत आहे. प्रमाणपत्रामुळे महिलांना कृषी विभागाच्या विविध योजनांमध्ये प्राधान्य मिळण्यास मदत होणार आहे.
आधुनिक, नैसर्गिक व सेंद्रिय शेती तसेच कृषीपूरक व्यवसायांसाठी प्रशिक्षणाची संधीही उपलब्ध होणार आहे. राज्यभरातही या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात ६२ लाख ७७ हजार ४९१ अर्ज प्राप्त झाले असून ९ लाख ९७ हजार ३५७ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील उर्वरित पात्र महिलांनीही कृषी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.