धावत्या कारमध्ये महिलेला लुटण्याचा प्रयत्न File Photo
रत्नागिरी

Ratnagiri : धावत्या कारमध्ये महिलेला लुटण्याचा प्रयत्न

कारचालकाकडून रॉडने हल्ला; महिला जखमी

पुढारी वृत्तसेवा

राजापूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. कोदवली बस स्टॉपवरून लिफ्ट मागणार्‍या महिलेला कारमध्ये बसवून तिला राजापुरात न उतरता पुढे नेत तिला लुटण्याचा प्रयत्न कारचालकाने केला. मात्र, या महिलेने दाखवलेल्या धाडसामुळे ती बचावली आहे. दरम्यान, या झटापटीत कारचालकाने या महिलेच्या डोक्यात रॉड घातल्याने ती गंभीर जखमी झाली असून तिला अधिक उपचारासाठी रत्नागिरीत हलवण्यात आले आहे. दरम्यान, कालचालक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

कोदवली येथे राहणार्‍या रश्मी चव्हाण या गुरुवारी सायंकाळी 5.30 च्या दरम्यान कोदवली येथून राजापूरला जाण्यासाठी कोदवली बस स्टॉपवर उभ्या होत्या. त्यांनी मुंबईकडून येणार्‍या एका कारला हात दाखवला. कार चालकाने त्यांना लिफ्ट दिली. मात्र कार चालकाने त्यांना राजापुरात न उतरता त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आपल्या सोबत काहीतरी अघटित घडतेय, याची कल्पना चव्हाण यांना आली. त्यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र या कार चालकाने त्यांच्या गळ्यातील दागिने काढण्याचा प्रयत्न केला.यावेळी त्यांनी जोरदार प्रतिकार केला याला चव्हाण यांनी जोरदार प्रतिकार केला. दरम्यान महामार्गावरील मोठ्या पुलाच्या पुढील रस्त्यावर त्यांनी गाडीतून दरवाजा उघडून उडी मारली. दरम्यान, त्यांच्यामध्ये गाडीत झालेल्या झटापटीत कार चालकाने त्यांच्या डोक्यात रॉड मारल्याचे त्यांनी सांगितले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

चव्हाण यांनी गाडीतून उडी मारल्यानंतर हा कारचालक पुन्हा गाडी मागे वळवून मुंबईच्या दिशेने फरार झाला आहे. यावेळी झालेल्या झटापटीनंतर गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या चव्हाण यांना तत्काळ स्थानिक रिक्षाचालक व ग्रामस्थांनी राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यांच्यावर तेथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी ठरविण्यात आले आहे. या प्रकरणी तत्काळ राजापूर पोलिसांनी दखल घेतली असून पोलीस अधिक तपास करत आहे. महामार्गावरील पेट्रोल पंप तसेच अन्य ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. दरम्यान, या घटनेतील कार ही व्हॅगनार असल्याची माहिती पुढे आली असून पोलीस अधिक तपास करत आहे. महामार्गावर भर दिवसा घडलेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली असून प्रवासी व खास करून महिलांमध्ये घबराट पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT