सासरचा जाच File photo
रत्नागिरी

Ratnagiri Crime : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेचा जीवन संपविण्याचा प्रयत्न; चौथ्या मजल्यावरून मारली उडी

पतीसह सासरच्या पाचजणांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून ३२ वर्षीय विवाहितेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्याची घटना २६ सप्टेंबर रात्री मांडवी येथे घडली. या घटनेत विवाहिता गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पती, सासू-सासरे पतीच्या दोन आत्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशना इम्रान सुवर्णदुर्गकर (वय ३२, रा. राजीवडा, रत्नागिरी) असे जखमी महिलेचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशना आणि तिचा पती इम्रान यांच्या विवाहाला पतीच्या कुटुंबातील काही नातेवाईकांचा विरोध होता. या कारणावरून एप्रिल २०२६ पासून २६ सप्टेंबरपर्यंत सासरच्या मंडळींकडून आपला शारीरिक व मानसिक छळ होत असल्याची तक्रार आशना यांनी केली आहे.

माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा पतीचा दुसरा विवाह करून देण्याची धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.तसेच घराबाहेर पडताना पर्स तपासणे, कौटुंबिक कार्यक्रमांना जाण्यास मनाई करणे आणि दोन्ही मुलांना आपल्यापासून दूर ठेवणे, असा त्रास दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. गेल्या आठ दिवसांपासून मुलांना आपल्याकडे देण्याची मागणी करूनही सासरच्या मंडळींनी मुलांना देण्यास नकार दिल्याचा आरोप महिलेने केला आहे.

या सततच्या त्रासाला कंटाळून शनिवारी दुपारी ३ वा.च्या सुमारास आशना यांनी मोबाईल घरात ठेवून राजीवडा येथील घर सोडले. त्यानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास मांडवी येथील अलहमपार्क इमारतीच्या ‘आय’ विंगच्या चौथ्या मजल्यावरून त्यांनी खाली उडी मारली. घटनेनंतर त्यांना तातडीने चिंतामणी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेत त्यांच्या उजव्या हातासह पायाला आणि शरीराच्या अन्य भागांना गंभीर दुखापत झाली आहे.

या प्रकरणी इम्रान खलील सुवर्णदुर्गकर, खलील सुवर्णदुर्गकर, नसिरा सुवर्णदुर्गकर, सरवरी सुवर्णदुर्गकर आणि परवीन मुनाब सुवर्णदुर्गकर (सर्व रा. राजीवडा, रत्नागिरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संदेश चव्हाण अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT