रत्नागिरी : पांढरा समुद्रकिनारा म्हणून ओळख असलेल्या आणि जिल्ह्याच्या मुख्यालयापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मिऱ्या-पंधरामाड पांढरा समुद्र किनारा परिसरात अनधिकृत वाळू उपशाने सीमा ओलांडली आहे. आतापर्यंत छुप्या मार्गाने आणि रात्रीच्या अंधारात चालणारा हा काळा व्यवसाय आता चक्क दिवसाढवळ्या सुरू आहे. खनिकर्म विभागाच्या नाकावर टिच्चून निसर्गाची लूट सुरू आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिक प्रचंड संतापले असून, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हे दिसते की नाही, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मिऱ्या परिसरात अनधिकृत वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सुरुवातीला हा उपसा केवळ रात्री आणि पहाटेच्या वेळी केला जात होता. मध्यरात्री वाळू भरून येणाऱ्या अवजड गाड्यांच्या आवाजा मुळे स्थानिकांची झोप उडाली होती. मात्र, आता वाळू माफियांना कोणाचाही धाक उरलेला नसल्याचे चित्र आहे. पंधरा माड परिसरात समुद्राच्या पात्रातून थेट बेकायदेशीर वाळू उपसा करून ती गाड्यांमध्ये भरली जात आहे. विशेष म्हणजे, हे सर्व जिल्हा प्रशासनाचे मुख्यालय असलेल्या रत्नागिरी शहराच्या अगदी जवळ घडत आहे.
वाळू उपशामुळे पर्यावरणाचेच नुकसान होत नसून, स्थानिक पायाभूत सुविधांनाही मोठा फटका बसला आहे. वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड गाड्यांमुळे मिऱ्या परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि ओल्या वाळूतून सांडणाऱ्या पाण्यामुळे रस्ते खराब होत आहेत. वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अवैध वाहतुकीवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. रत्नागिरी हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असून येथे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि खनिकर्म विभागाची मुख्य कार्यालये आहेत. असे असूनही काही अंतरावर सुरू असलेला हा प्रकार खनिकर्म विभागाला दिसत नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणी आता बंधाऱ्याचे कामही होत असून बंधाऱ्याच्या समोरही वाळूचा उपसा होत आहे. वेळीच हा उपसा थांबला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. काही ठिकाणी शहरात पोलिस चौक्याही असून पोलिस कर्मचाऱ्यांशीही या वाळू व्यावसायिकांची मिलिभगत असल्याची चर्चा होऊ लागली आहे.