रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने घेतली चार दिवसांनंतर विश्रांती Pudhari
रत्नागिरी

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने घेतली चार दिवसांनंतर विश्रांती

३० जूनपर्यंत यलो अलर्ट; सरासरी ३०६ मिमी पावसाची नोंद, शेतकऱ्यांना दिलासा

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सलग चार दिवस दमदार हजेरी लावल्यानंतर शनिवारी पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे दिवसभर सूर्यदर्शन झाले असून काही प्रमाणात उकाडाही जाणवला. १ ते २७ जून या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ३०६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जून महिन्याच्या सुरुवातीला केवळ दोन दिवस पावसाने हजेरी लावल्यानंतर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. नद्या आणि धरणांमधील पाणीसाठा कमी होत चालला होता. मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनचे दमदार आगमन झाल्याने चित्र बदलले आहे. सलग चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुबार पेरणीचे संकट टळले असून भात, नाचणीसह इतर पिकांच्या पेरणीला वेग आला आहे. काही ठिकाणी भात लागवडीलाही सुरुवात झाली आहे.

दरम्यान, शुक्रवारी काही प्रमाणात पाऊस झाला होता. मात्र शनिवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्याने पाच दिवसांनंतर सूर्यनारायणाचे दर्शन झाले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला असला तरी उकाड्यामुळे काही प्रमाणात अस्वस्थता जाणवली. तसेच पावसाळ्यातील उरलेली कामे करण्यासाठी नागरिक धावपळ करत आहेत.

हवामान विभागाने जिल्ह्याला रविवार, सोमवार आणि मंगळवारपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात वादळी वाऱ्यासह ताशी ४० किमी वेगाने सोसाट्याचा वारा आणि पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT