दापोलीत मुसळधार; पंचनदी धरण तुडुंब, विसर्ग सुरू 
रत्नागिरी

Ratnagiri Rain : दापोलीत मुसळधार; पंचनदी धरण तुडुंब, विसर्ग सुरू

तालुक्‍यात २४ तासांत १३०.५७ मि.मी. पावसाची नोंद; धरणाची पाणी पातळी पोहोचली कमाल मर्यादेला

पुढारी वृत्तसेवा

दापोली : दापोली तालुक्यात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचनदी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणातून नियंत्रित पद्धतीने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण तुडुंब भरल्याने परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने धरणाची पाणीपातळी कमाल मर्यादेला पोहोचली. त्यामुळे धरणातून नियोजित पद्धतीने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

दरम्यान, तालुक्यातील नद्या, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहत असून काही सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या तसेच सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याच कालावधीत दापोली तालुक्यात सरासरी १३०.५७ मिमी पावसाची नोंद झाली असून, चालू पावसाळी हंगामातील एकूण पर्जन्यमान ३७८.६४ मिमी इतके झाले आहे.

सातही केंद्रांमध्ये मिळून ९१४ मिमी पावसाची नोंद झाली असून, वेळवी येथे सर्वाधिक २०० मिमी, तर बुरोंडी येथे सर्वात कमी ३१ मिमी पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जलस्रोत वेगाने भरत असून शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब मानली जात आहे. मात्र, पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी अनावश्यकपणे नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT