Water Supply Pudhari
रत्नागिरी

Ratnagiri Water Supply : दोन दिवस पाणी बंद?

एक दिवसाची कपात सुरूच; दुसऱ्या दिवसाच्या प्रस्तावाने नागरिक संभ्रमात, पाणी बचतीसोबत पर्यायी स्रोतांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : पावसाळा संपताच रत्नागिरी शहरावर पाणीटंचाईचे सावट गडद होऊ लागले आहे. शहरात दर सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय लागू असतानाच आठवड्यातून आणखी एक दिवस पाणी बंद ठेवण्याची शक्यता व्यक्त झाल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. पाणी जपून वापरण्याची गरज मान्य असली, तरी वारंवार पाणीपुरवठा बंद ठेवण्याऐवजी पर्यायी जलस्रोत तातडीने कार्यान्वित करावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

कमी पर्जन्यमान आणि वाढत्या तापमानामुळे पाण्याचे नियोजन करण्याची वेळ आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणातील उपलब्ध साठ्याचे नियोजन करण्यासाठी नगर परिषदेने १२ ऑक्टोबरपासून दर सोमवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. याशिवाय, नियमित पाणीपुरवठ्याच्या वेळेतही १५ मिनिटांची कपात करण्यात आली आहे.

दुसऱ्या दिवसाच्या कपातीची चर्चा

सध्याची एक दिवसाची कपात पुरेशी ठरणार नसल्याचे पाटबंधारे विभागाने नगर परिषदेला तोंडी सूचित केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आठवड्यातून आणखी एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा पर्याय चर्चेत आला आहे; मात्र लेखी सूचना आणि नगर परिषदेचा अंतिम निर्णय झाल्याची पुष्टी उपलब्ध नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवसाची कपात अद्याप संभाव्य स्वरूपातच आहे. या शक्यतेमुळे घरगुती पाणी नियोजन, स्वयंपाक, कपडे धुणे, स्वच्छता आणि लहान व्यावसायिकांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची चिंता आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना नागरिकांना कपातीची पूर्वसूचना, निश्चित वेळापत्रक आणि पाण्याच्या उपलब्धतेबाबत नियमित माहिती द्यावी, अशी अपेक्षा आहे.

पाणी गळती रोखणे, अनावश्यक वापरावर नियंत्रण आणणे आणि उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर करणे यावरही भर देणे आवश्यक आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवसाची पाणी कपात प्रत्यक्ष लागू होणार की नाही, याबाबत नगर परिषदेच्या अंतिम निर्णयाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. पाणीटंचाई टाळण्यासाठी बचत आवश्यक असली, तरी नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळण्यासाठी पर्यायी उपाययोजना किती वेगाने पूर्ण होतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

पर्यायी स्रोत तातडीने सुरू करण्याची अपेक्षा

पाणी बचतीच्या उपाययोजनांबरोबरच शहराला अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देणाऱ्या पर्यायी स्रोतांवर भर देण्याची गरज आहे. पानवल धरणातील पाणी नाचणे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्यासाठी जलवाहिनीचे काम, नाचणे तलावातील गाळ काढणे आणि शीळ धरणावरील जुनी विहीर कार्यान्वित करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याची माहिती यापूर्वी देण्यात आली आहे.

अधिक अडचणींचा सामना करावा लागणार

विशेषतः साठवणुकीची पुरेशी व्यवस्था नसलेल्या घरांना पाणीपुरवठा बंद असलेल्या दिवशी अधिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT